इचलकरंजी : शेतकरी व कामगारांच्या विरोधात कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी येथील कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने बुधवारी के. एल. मलाबादे चौकात आदेश पत्राची होळी करण्यात आली. कामगार कायदे व शेतकरीविरोधी कायदे करून केंद्र सरकारने या घटकांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
मोदी सरकारने शेतकरी व कामगारांवर जाचक कायदे लादले आहेत. यामध्ये किमान वेतन, ओव्हर टाईम, संपाचा अधिकार, तसेच शेतकऱ्यांना शेतीबाबत कोणतेही संरक्षण राहणार नाही. हमीभाव मिळणार नाही. ८४ टक्के जनता रेशनपासून वंचित राहील, या सर्वांचा गांभीर्याने विचार करून हे कायदे रद्द करावेत. तसेच कामगारांवर अन्यायकारक अटी व शर्ती लागू केल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये, याकरिता चुकीचे कामगार कायदे रद्द व्हावेत, अशी मागणी करीत मलाबादे चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सदा मलाबादे, दत्ता माने, भरमा कांबळे, ए. बी. पाटील, धोंडिराम कुंभार, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
०३०२२०२१-आयसीएच-०१
के. एल. मलाबादे चौकात कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने शेतकरी व कामगारविरोधी कायद्याच्या आदेश पत्राची होळी करण्यात आली.
छाया-उत्तम पाटील