इचलकरंजी : किमान वेतनाची अंमलबजावणी करा, फरकाच्या केसेस तत्काळ निकालात काढा, फरकाच्या रकमा द्या, अशा विविध मागण्यांसाठी येथील लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने सोमवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी गुरुवारी (दि. २१) संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन शिरस्तेदार मनोजकुमार ऐतवडे यांनी दिले. त्यावर गुरुवारी तोडगा न निघाल्यास शुक्रवारी (दि. २२) कार्यालयाला टाळे ठोकून त्याचा ताबा घेण्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला.
शाहू पुतळ्यापासून निघालेला मोर्चा मुख्य मार्गावरून मलाबादे चौकातून फिरून प्रांत कार्यालयावर आला. मोर्चाच्यावतीने प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये वरील मागण्यांसह जुलैच्या महागाई भत्त्यातील दोष दूर करा. कोल्हापूरच्या धर्तीवर कामगारांसाठी घरकुल योजना राबवा. ईएसआय दवाखान्यातील सेवा-सुविधांची अंमलबजावणी करा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मोर्चाचे नेतृत्व प्राचार्य ए. बी. पाटील, आनंदराव चव्हाण व सुभाष निकम यांनी केले. यावेळी चंद्रकांत गागरे, सूर्यकांत शेंडे, मारुती जाधव, हणमंत मुत्तूर, कृष्णात कुलकर्णी, पदाधिकारी व कामगार सहभागी झाले होते.गुरव यांचा जाहीर निषेधसहायक कामगार आयुक्त गुरव यांच्याकडे इचलकरंजीसह कोल्हापूर व सांगलीतील कार्यालयाचा कार्यभार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी गेले असता ते नेहमी वेगवेगळ्या ठिकाणांची कारणे देतात. मोर्चा व आंदोलनाला तारीख देऊनही उपस्थित राहत नाहीत. सोमवारीही ते उपस्थित राहिले नाहीत. अशा बेफिकीर अधिकाºयाचा आंदोलकांनी जाहीर निषेध केला.