कोल्हापूर : कोल्हापुरातील जलतरण निवड चाचणी घेण्याची जबाबदारी स्विमिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्रने माझ्यावर आणि स्विमिंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या (एसएफआय) तीन निरीक्षकांवर सोपविली आहे. त्यानुसार शनिवारी (दि. १८) इचलकरंजीतील शंकरराव पुजारी जलतरण तलाव येथे निवड चाचणी स्पर्धा होईल. त्यामध्ये कोणत्याही संघटनेचा हस्तक्षेप असणार नाही. एसएफआयने सकारात्मक भूमिका घेतल्याने पालकांनी या स्पर्धेवरील बहिष्कार मागे घेतला आहे, अशी माहिती या स्पर्धेचे एसएफआय नियुक्त संचालक विक्रम खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.खाडे म्हणाले, जिल्हास्तरीय निवड चाचणीबाबत अधिकृत संघटना कोणती याबाबत वाद आहेत, अशा स्थितीत स्विमिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्रने दोन्ही संघटनांना अलिप्त ठेवले असून, निवड चाचणी घेण्यासाठी या स्पर्धेचे संचालक म्हणून काम करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून जबाबदारी मी स्वीकारली आहे.
या स्पर्धेसाठी एसएफआयचे सदस्य नीता तळवलकर, कमलेश नगरकर, संतोष पाटील हे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. या चाचणीतील प्रत्येक गटातील एक ते सहा क्रमांकाचे विजेते खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडण्यात येतील. निवड झालेले खेळाडू दि. ३१ मे ते दि. २ जून दरम्यान बालेवाडी (पुणे) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व करतील.
शनिवारी सकाळी आठ वाजता स्पर्धा सुरू होईल. वय वर्षे ९ ते १०, ११, १२ ते १४, १५ ते १७ या गटांमध्ये स्पर्धा होणार आहे. निवड चाचणी असल्याने खेळाडूंना पदक अथवा प्रमाणपत्र दिले जाणार नाही. या पत्रकार परिषदेस प्रशिक्षक मानसिंग पाटील, निळकंठ आखाडे, पालक कृती समितीचे रमेश मोरे, शशांक देशपांडे, गणेश देसाई, जीवन बोडगे, सतीश पाटील, समीर चौगुले, आदी उपस्थित होते.प्रशिक्षकांकडे प्रवेशिका द्याव्यातस्पर्धेबाबत पालक, खेळाडूंनी संभ्रमावस्थेत राहू नये. खेळाडूंनी त्यांच्या प्रवेशिका प्रशिक्षकांकडे आज, शुक्रवारी सायंकाळी सातपर्यंत जमा करावी. त्यासमवेत आधारकार्ड, जन्मतारखेचा दाखला सादर करावा. स्पॉट एंट्री घेतली जाणार नसल्याचे खाडे यांनी सांगितले.
आणखी ‘वीरधवल’ घडवूयाआंतरराष्ट्रीय जलतरणपटू वीरधवल खाडे याच्यानंतर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचे फारसे खेळाडू चमकलेले नाहीत; त्यामुळे कोणत्याही वादात अडकण्यापेक्षा आपण सर्वांनी मिळून कोल्हापूरमधून आणखी ‘वीरधवल’ घडविण्यावर भर देऊया, असे आवाहन खाडे यांनी केले.