लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील व्यापाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार अखेर सोमवारी सकाळी आपली दुकाने उघडली. त्याला नगरपालिकेच्या पथकाने विरोध केल्याने व्यापारी व कर्मचारी यांच्यात वाद-विवाद घडला. त्यानंतरही दुकाने सुरूच ठेवण्यात आली होती. दरम्यान, कोल्हापुरात झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार दोन दिवस आंदोलन स्थगित करून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला.
प्रशासनाने व्यापाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम, अटींचे पालन करत ठरावीक वेळेत दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी अनेक वेळा केली.
मात्र, प्रशासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व्यापाऱ्यांना सवलत नाकारली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आपली दुकाने उघडली. यामुळे के. एल. मलाबादे चौकात व्यापारी व अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. व्यापाऱ्यांनी प्रशासनास गेल्या ८५ दिवसांपासून दुकाने बंद ठेवून सहकार्य केले आहे. आता व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. गाळा भाडे व वीज बिल अंगावर पडत आहे. त्यामुळे आता थांबणे शक्य नाही, असे म्हणत व्यापाऱ्यांनी सोमवारी दुकाने उघडली. यावेळी व्यापारी व प्रशासन यांच्यात काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, कोल्हापुरातील बैठकीत पोलीस अधीक्षकांनी दोन दिवसांत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने बंद करत आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित केले.
चौकट
माझे दुकान माझी जबाबदारी
व्यापाऱ्यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या धर्तीवर ‘माझी आस्थापना माझी जबाबदारी' असे म्हणत दुकान उघडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार दुकान उघडून काही व्यापारी प्लास्टिकचे फलक शर्टवर अडकवून फिरत होते. त्यावर विविध आवाहने व प्रश्न उपस्थित केले होते.
फोटो ओळी
२८०६२०२१-आयसीएच-०३
इचलकरंजीत के. एल. मलाबादे चौकात व्यापारी व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली.
२८०६२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजीत दुकाने सुरू झाल्याने मुख्य चौकातील नगरपालिका कॉम्प्लेक्स गजबजले होते.
२८०६२०२१-आयसीएच-०५
इचलकरंजी नागरिक मंचच्या कार्यकर्त्यांनी प्लास्टिकचा फलक परिधान करून व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत सूचना दिल्या.