इचलकरंजी : येथील चंदूर रस्त्यावरील जामदार मळा परिसरातून जात असताना एका इलेक्ट्रिक मोटारसायकलने पेट घेतला. या अचानक घडलेल्या घटनेत मोटारसायकलस्वार रितेश कमलेश केसरवाणी याने प्रसंगावधान दाखवत मोटारसायकल रस्त्याकडेला लावून बाजूला झाला. तेथूनच जाणाऱ्या चौघा तरुणांनी पेटलेल्या मोटारसायकलवर पाणी मारत आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला.
रितेश हे जामदार मळा परिसरात राहण्यास असून, रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास इलेक्ट्रिक मोटारसायकरवरून गोडावूनमधील काम आटोपून घराकडे निघाले होते. जामदार मळा परिसरात आले असता अचानक मोटारसायकलने पेट घेतला. काही कळायच्या आतच आग मोटारसायकलवर सर्वत्र पसरू लागली. यावेळी रितेश यांनी प्रसंगावधान दाखवत मोटारसायकल रस्त्याकडेला लावली. यावेळी परिसरातील एका खासगी हॉस्पिटलमार्गे चंदूरकडे मोटारसायकलवरून जाणाऱ्या अशोक कांबळे, उमेश चव्हाण, स्वप्नील गोरे, आशुतोष भाईमाने या चौघा तरुणांनी ही घटना पाहिली. त्यांनी कोणत्याही गोष्टीचा विलंब न लावता पेट घेतलेल्या मोटारसायकलवर पाण्याने जोराचा मारा केला. त्यामुळे ही आग आटोक्यात येऊन पुढील अनर्थ टळला. यामध्ये मोटारसायकलचे मोठे आर्थिक नुकसान झाले. रितेश यांनी काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिक मोटारसायकल खरेदी केली. अचानक मोटारसायकलने पेट घेतल्याने नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
फोटो ओळी
२६०९२०२१-आयसीएच-०६
इचलकरंजीत इलेक्ट्रिक मोटारसायकलने अचानक पेट घेतला.