अरुण काशीदइचलकरंजी : इचलकरंजी शहराला शैक्षणिक तालुका म्हणून लवकरच राज्य सरकारची मान्यता मिळणार आहे. यामुळे शासनाच्या सर्व शैक्षणिक सुविधा थेट मिळण्याबरोबरच शहर शैक्षणिक हब होण्यासाठी मदत होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर इचलकरंजी शहर हे राज्यातील चौदावा शैक्षणिक तालुका बनणार आहे.शहराने गेल्या काही वर्षांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग यश प्राप्त केले आहे. प्राथमिकपासून उच्च माध्यमिकपर्यंतच्या शैक्षणिक सुविधा शहरात उपलब्ध आहेत. तांत्रिक शिक्षणाच्या दृष्टीनेसुद्धा शहराने आघाडी घेतली आहे. इचलकरंजीमध्ये महापालिका स्थापन झाली आहे. असे असले, तरी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या सुविधेसाठी जिल्हास्तरावर अवलंबून राहावे लागत होते. विद्यार्थ्यांचा गणवेश व पाठ्यपुस्तके जिल्ह्याला मिळाल्यानंतर इचलकरंजी शहराला मिळत असे.शैक्षणिक सुविधेसाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत होता. सध्या राज्यामध्ये १३ शैक्षणिक तालुके आहेत. इचलकरंजी शैक्षणिक तालुका करावा, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली होती. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठविला होता. त्यांची मान्यता मिळाली असून, हा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या सचिवांकडे गेला आहे. येणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आवश्यक असणारा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (एमपीएसटी) कडून अनेक शैक्षणिक सुविधा मिळणार आहेत. प्राथमिक व माध्यमिक विभागाला मोठा फायदा होणार आहे. शहरात न्याय संकुल, महापालिकेला मंजुरी मिळाली आहे. यानंतर शैक्षणिक तालुक्यास मंजुरी मिळाल्यास मोठा मैलाचा दगड ठरणार आहे.
शैक्षणिक तालुक्याचे फायदेबालभारतीकडून महापालिकेच्या शिक्षण विभागाला थेट पाठ्यपुस्तके मिळणार.गणवेश व अन्य शैक्षणिक साहित्यांचे अनुदान थेट मिळणार.
विविध पदे मिळणार थेटकार्यक्रम अधिकारी, कनिष्ठ अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर, लिपीक, साधन व्यक्ती, विषय शिक्षक, दिव्यांग मुलांसाठी विशेष शिक्षक, अशी पदे एमपीएसपीकडून थेट मिळणार.
शैक्षणिक तालुका जाहीर झाल्यानंतर विविध शैक्षणिक सुविधा मिळण्याबरोबरच शिक्षण क्षेत्रात शहराची उंची वाढेल. शैक्षणिक हबच्या निर्मितीला पोषक वातावरण तयार होईल. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. - रवींद्र माने, जिल्हाप्रमुख शिवसेना.