इचलकरंजी : येत्या आठ दिवसांत ठेकेदार कंपनीला एक महिन्याचे पंधरा लाख २० हजार रुपये बिल अदा केले जाईल. तसेच १५व्या वित्त आयोगातून जसा निधी उपलब्ध होईल, त्यानुसार बाकीची रक्कम देण्यात येईल. तसेच येथून पुढील कालावधीत रस्त्यावरील वीज बंद न करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर शहरवासीयांची अंधारातून सुटका होणार आहे.
नगरपालिकेने शहरातील पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या खासगी कंपनीचे गेल्या नऊ महिन्यांपासून जवळपास एक कोटी ३५ लाख रुपयांचे बिल थकविले आहे. त्यामुळे कंपनीने शहरातील स्ट्रीट लाइट बंद केल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या दालनात कंपनीचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक झाली.
कंपनीने ऑनलाइन सुविधा बंद करून ऑफलाइन पद्धतीने सुविधा द्यावी. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात लाइट नसल्याने विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, असे म्हणत उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. नगरपालिकेकडून बिल अदा केले जाईल. स्ट्रीट लाइट ताबडतोब सुरू करा, अशी मागणी अशोक स्वामी यांनी केली, तर शहरातील लाइट गेल्यामुळे नागरिकांतून रोष व्यक्त होत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप करत नगरसेवक प्रकाश मोरबाळे, मदन झोरे, राजू बोंद्रे, इकबाल कलावंत यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
कोरोना महामारी व शहरात नुकताच येऊन गेलेला महापूर यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. कर वसुली अद्याप ठप्प आहे. त्यामुळे कंपनीस बिले देण्यास अडचण होत असल्याचे नगराध्यक्षा स्वामी यांनी स्पष्ट केले. तरीही येत्या आठ दिवसांत कंपनीस एक महिन्याचे बिल अदा केले जाईल. १५व्या वित्त आयोगातून जसा निधी उपलब्ध होईल, त्यानुसार अन्य रक्कम दिली जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी दिले. तसेच कंपनीचे अधिकारी नचिकेत निकम व किरण गौडाजे यांनी पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीचे काम त्वरित सुरू केले जाईल तसेच येत्या सोमवारी ५०० नवीन बल्बची सोय करण्याचे आश्वासन दिले.
010921\01kol_17_01092021_5.jpg
०१०९२०२१-आयसीएच-०२इचलकरंजीतील स्ट्रीट लाईटच्या बिलासंदर्भात निर्णय घेवून शहरातील लाईट सुरू करण्याबाबत नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या दालनात कंपनीच्या व्यवस्थापकांसोबत बैठक झाली. यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, प्रकाश मोरबाळे, राजू बोंद्रे, अशोक स्वामी, आदी उपस्थित होते.