इचलकरंजी : कृष्णा नदीतील पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची घट झाल्यामुळे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात ५० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच इचलकरंजीस पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या.मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे नदीत असलेल्या इंटेक वेलला पाणी पोहोचत नसल्याने दोन पंपांऐवजी एकाच पंपामार्फत पाण्याचा उपसा सुरू आहे. नदीमध्ये पाण्याची पातळी ५५२.५ मीटर इतकी आवश्यक असताना सध्या ती ५२१.६० मीटर इतकी आहे, अशी माहिती नगरपालिकेने बुधवारी रात्री उशिरा जारी केलेल्या पत्रकात दिली आहे. सदरची पातळी आणखीन खालावल्यास दुसरा पंपसुद्धा बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, कृष्णा नदीतील पाण्याच्या पातळीमध्ये किमान दीड मीटरने वाढ व्हावी, म्हणून राजापूर बंधाऱ्यामध्ये बरगे घालून पाणी अडविले पाहिजे, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अॅड. अलका स्वामी, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, जलअभियंता सुरेश कमळे, सभापती नितीन जांभळे, आदींनी सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव कोरे यांची भेट घेतली. त्यामुळे बुधवारी तातडीने बंधाऱ्याला बरगे घालण्याचे काम सुरू करण्यात आले, असेही या पत्रकात नमूद केले आहे. साधारणत: मजरेवाडी येथील पाण्याची पातळी वाढण्यास आणखीन आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्यामुळे दरम्यानच्या काळात शहरास होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये ५० टक्क्याने कपात होणार आहे. सध्या तीन दिवसांतून मिळणारे पाणी, पाच दिवसांतून एक वेळ मिळणार असल्याने उन्हाळ्यापूर्वीच पाणी टंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. (प्रतिनिधी)
इचलकरंजीत पाणीटंचाई
By admin | Published: February 09, 2017 12:15 AM