अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरात तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरणारा आठवडा बाजार मुख्य रस्त्याच्या दुतर्फा भरत असल्याने साऱ्या इचलकरंजीची कोंडी झाली आहे. बाजारच रस्त्यावर भरत असल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद राहत असल्याने शहराच्या इतर रस्त्यांवर वाहतुकीचा ताण येत आहे.
पूर्वी शहरातील जनता चौक ते गांधी पुतळा या मुख्य मार्गावर दर शुक्रवारी इचलकरंजीचा बाजार भरत होता. कालांतराने वाहतुकीच्या प्रश्नावरून येथील बाजार स्थलांतरित करण्यात आला. त्यानंतर थोरात चौकात बाजारकट्टे बांधून तेथेही बाजार भरण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर अण्णा रामगोंडा शाळेसमोर नियमित बाजार सुरू करण्यात आला. आता या तीनही प्रमुख ठिकाणी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात, तर मंगळवारी काही प्रमाणात बाजार भरतो. त्यामध्ये शहरालगतच्या ग्रामीण भागातून येणारे शेतकरी, भाजीपाला विक्रेते, दलाल यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. विक्रेते व खरेदीला आलेले नागरिक या तुडुंब गर्दीमुळे दुचाकी वाहनासही मार्ग मिळत नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे.
विशेष म्हणजे या मार्गावर आयजीएम रुग्णालय असून, मंगळवार अथवा शुक्रवार असल्यास एखाद्या रुग्णास रुग्णवाहिकेतून अन्यत्र स्थलांतरित करावयाचे झाल्यास मार्ग मिळणे अशक्य असते. परिणामी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागतो. यावर उपाय म्हणून या मार्केटलगत असलेल्या ओपन स्पेसवर पेव्हींग ब्लॉक बसवून बाजारासाठी पट्टे आखून दिले. काही दिवस सुरळीत चालले. परंतु पुन्हा विक्रेत्यांची संख्या वाढून रस्त्यावर बाजार व वाहनांचे पार्किंग होऊन अडथळा कायम राहिला आहे. (उद्याच्या अंकात गारगोटी)
येथे भरू शकतो पर्यायी बाजार
तिन्ही बाजार परिसरातील जास्त होणाऱ्या विक्रेत्यांना दिवस विभागून देण्याची गरज आहे. शहरातील कलानगर, प्रांत कार्यालयालगत, जुने बसस्थानक अशा ओपन स्पेसवर पर्यायी जागा दिल्यास वाहतुकीच्या कोंडीवर बऱ्यापैकी मार्ग निघू शकतो.
धूळ-मातीतील भाजी
मुख्य मार्गावर भाजीपाला, फळविक्रेते दिवसभर बसलेले असतात. त्यामुळे भाज्यांवर मातीचा थर बसलेला असतो. तीच भाजी घाईगडबडीत ग्राहकाला खरेदी करावी लागते.
फोटो ओळी : इचलकरंजी येथील आठवडा बाजारात अशी गर्दी होते. त्यामुळे वाहतुकीचा पुरता बट्ट्याबोळ उडतो. (फोटो-१६०२२०२१-कोल-इचलकरंजी) (छाया- उत्तम पाटील)