इचलकरंजी : नगरपालिकेकडील उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी ३० डिसेंबरला पालिकेची विशेष सभा होत असून, या निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पालिकेतील नवनिर्वाचित सभागृहात स्वीकृत सदस्यांच्या पाच जागांसाठी प्रत्येक घटक पक्षाला प्रतिनिधित्व मिळणार असले तरी उपनगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या निवडीबद्दल उत्सुकता लागली आहे.पालिकांच्या निवडणुकीसाठी २७ नोव्हेंबरला मतदान आणि २८ नोव्हेंबरला मतमोजणी झाली. निवडणुकीच्या निकालात नगराध्यक्ष म्हणून भाजपच्या अॅड. अलका स्वामी विजयी झाल्या. मात्र, ६२ नगरसेवकांच्या निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी-शाहू आघाडीचे ३५ नगरसेवक निवडून आले. भाजप-ताराराणी आघाडीचे २७ नगरसेवक विजयी झाले. नगराध्यक्ष भाजपच्या, तर नगरसेवकांचे संख्याबळात बहुमत कॉँग्रेस-राष्ट्रवादी-शाहू आघाडीचे अशी विचित्र स्थिती निर्माण झाली.अशा स्थितीत उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडण्यासाठी १७ डिसेंबरला पालिकेची विशेष सभा आयोजित केली. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी होते. पण नगरविकास विभागाकडून १६ डिसेंबरला नवनिर्वाचित नगरपालिकांची पहिली सभा पुढे ढकलण्याबाबत निर्देश देणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना आले. त्यामुळे १७ डिसेंबर रोजीची विशेष सभा पुढे ढकलली. आता उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीसाठी ३० डिसेंबरला विशेष सभा आयोजित केली आहे. या सभेचे अध्यक्ष नगराध्यक्ष असणार आहेत. दरम्यान, स्वीकृत सदस्यांची नामनिर्देशित पत्रे संबंधित पक्षप्रतोदांनी या सभेच्या एक दिवस पूर्वी प्रांताधिकाऱ्यांना द्यावयाची असून, प्रांताधिकारी नामनिर्देशित पत्रांची छाननी करून ते नगराध्यक्षांना देणार आहेत. नगराध्यक्ष ३० डिसेंबरच्या सभेत घटक पक्षांना मिळालेल्या कोटानिहाय स्वीकृत सदस्यांच्या निवडी जाहीर करणार आहेत. इचलकरंजीत स्वीकृत सदस्यपदासाठी कोटानिहाय पद्धतीने कॉँग्रेसचे शशांक बावचकर, राष्ट्रवादीचे राजू खोत, शाहू आघाडीचे मदन कारंडे, भाजपचे अजित जाधव व ताराराणी आघाडीचे चंद्रकांत शेळके यांची नावे निश्चित झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडी ३० डिसेंबरच्या सभेत जाहीर होतील. बहुमतानुसार उपनगराध्यक्षपद हे कॉँग्रेस-राष्ट्रवादी-शाहू आघाडीच्या वाट्याला आले असून, कॉँग्रेसकडून राहुल खंजिरे, संजय कांबळे, अमर जाधव, तर शाहू आघाडीकडून विठ्ठल चोपडे व प्रकाश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. (प्रतिनिधी) नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अस्तित्व नाममात्र ?नगरपालिकेतील मावळत्या नगरसेवकांची मुदत २० डिसेंबरपर्यंत होती. तर २१ डिसेंबरपासून नवीन नगरसेवकांचे सभागृह अस्तित्वात येणे आवश्यक होते. मात्र, ३० डिसेंबरला होणाऱ्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीच्या सभेनंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अधिकृत कामकाज सुरू होणार आहे. दरम्यान, २१ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे अस्तित्व नाममात्र राहणार का? अशी चर्चा नगरपालिका क्षेत्रात आहे.नगराध्यक्षांना मताच्या अधिकारामुळे काँग्रेसची गोची शक्यइचलकरंजी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित सभागृहात भाजपप्रणीत आघाडीकडे २७ नगरसेवक, तर कॉँग्रेसप्रणीत आघाडीकडे ३५ नगरसेवक असे बलाबल आहे. मात्र, शासनाने आता जनतेतून थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना स्वत:चे एक व आणखीन विशेष मताचा (कास्टिंग) अधिकार दिला आहे.त्यामुळे भाजपप्रणीत आघाडीकडे २९ अशी मतांची बेरीज होत असून, कॉँग्रेसप्रणीत आघाडीकडून सात सदस्य अनुपस्थित राहिल्यास नगरपालिकेच्या सभागृहामध्ये भाजपचे बहुमत होणार असल्याने सभागृहामध्ये जास्तीत जास्त सदस्य उपस्थित ठेवण्यासाठी कॉँग्रेस आघाडीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.शिक्षण सभापतींना महत्त्वशासनाने नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळे बरखास्त केली असून, आता नवनिर्वाचित शिक्षण समितीच्या सभापतीकडे शिक्षण मंडळाचा कारभार येणार आहे. परिणामी नगरपालिकांमधील शिक्षण समिती व त्यांचे सभापती यांना आता महत्त्व प्राप्त होणार आहे. शिक्षण मंडळ व मंडळाकडील शाळा चालविण्यासाठी या समितीकडे भरीव आर्थिक तरतूद असल्यामुळे पूर्वीचे शिक्षण समितीचे असणारे नाममात्र अस्तित्व आता नाहीसे होणार आहे.
इचलकरंजीत मोर्चेबांधणीस वेग
By admin | Published: December 27, 2016 11:50 PM