कोल्हापूर : गेले ५२ दिवस इचलकरंजीतील पेटलेल्या सायझिंग कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी पालकमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना वेळ नाही. महापालिका निवडणुकीत पराभव झाला तर कदाचित आपले मंत्रिपद जाईल, मग जनतेतून निवडून आलेले आमदार सुरेश हाळवणकर त्यावर दावा करतील. या भीतीपोटीच हाळवणकर यांना नामोहरम करण्यासाठी इचलकरंजीमधील प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा घाट पालकमंत्र्यांनी घातल्याची टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली. आमदार मुश्रीफ म्हणाले, सायझिंग कामगार, मालक यांच्यामध्ये तोडगा निघेना, अनेक बैठका झाल्या लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख यांचा निर्णय दोन्ही घटकांना मान्य नाही. इचलकरंजी जिल्ह्याची शान आहे, या शहरातील हजारो कामगारांच्या चुली गेले पन्नास दिवस पेटलेल्या नाहीत. सायझिंगधारक, यंत्रमागधारक मालक बँकांची कर्जे कशी भागवायची, या विवंचनेत आहेत, अशी परिस्थिती असताना वस्त्रोद्योग मंत्री पाटील एकदाही इचलकरंजीला गेले नाहीत, याचे आश्चर्य वाटते. मग संधी आलीच तर हाळवणकर यांना नामोहरम करण्यासाठी या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचे राजकारण मंत्री पाटील खेळत असावेत, असे आमच्यासारख्या सामान्य बुद्धी असणाऱ्याला वाटते. त्यांनी काळजी करू नये, भाजपचे अध्यक्ष अमित शहा त्यांचे जवळचे मित्र आहेत, त्यांच्या मंत्रिपदाला कोणताही धोका येणार नाही. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाची काळजी न करता इचलकरंजीत बैठका घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा. (प्रतिनिधी)...मग दहीहंडीला वेळ कसा? --इचलकरंजीचा प्रश्न ऐरणीवर आल्याने कामगार, यंत्रमालकांसह आमच्यासारखे कार्यकर्तेही हवालदिल झाले आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री पाटील यांच्याकडे वेळ नाही, पण ‘चाय पे चर्चा’, आमच्यावर टीका करण्यासाठी, दहीहंडी कार्यक्रमासह जिल्ह्यातील इतर कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी वेळ कसा मिळतो, असा सवाल आमदार मुश्रीफ यांनी केला.
मंत्रिपदाच्या भीतीपोटीच दादांचे इचलकरंजीकडे दुर्लक्ष
By admin | Published: September 12, 2015 12:29 AM