इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीचा पूर ओसरू लागला असून दिवसभरामध्ये पाण्याची पातळी १ फूट १० इंचाने उतरली. दरम्यान, नगरपालिकेने पूरग्रस्तांसाठी उघडलेल्या सहा छावण्यांपैकी दोन छावण्यांतील कुटुंबे त्यांच्या घराकडे परतली. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तात्पुरता का होईना सुटकेचा श्वास सोडला.गेले चार दिवस पावसाने उघडीप दिली असली तरी पंचगंगा नदीच्या पुराच्या पातळीत वाढ होत होती. त्यामुळे नगरपालिकेने पूरग्रस्त झालेल्या कुटुंबांसाठी सहा ठिकाणी छावण्या उघडल्या होत्या. या छावण्यांमध्ये १६८ कुटुंबांतील सुमारे ८०० व्यक्तींना स्थलांतरित केले होते. शुक्रवारी (दि. १५) पुराची पातळी स्थिरावली असली तरी ती उतरत नसल्यामुळे पालिका प्रशासन आणि पूरग्रस्तांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शुक्रवारी (दि. १५) मध्यरात्रीपर्यंत पुराचे पाणी ओसरू लागले.दिवसभरामध्ये १ फूट १० इंच पाण्याची पातळी कमी झाली. त्यामुळे शनिवारी सायंकाळपर्यंत नगरपालिका गेस्ट हाऊस व सिकंदर दर्गा याठिकाणी असलेल्या छावण्यांमधील ४२५ नागरिक त्यांच्या घराकडे परतले. मात्र, अद्यापही चार छावण्यांमध्ये ८९ कुटुंबे राहत आहेत. पूर ओसरण्याची अशीच स्थिती राहिली तर येत्या दोन दिवसांत उर्वरित कुटुंबेसुद्धा त्यांच्या घरी परततील. (प्रतिनिधी)जीर्ण इमारतींबाबत आता कडक भूमिकागावभाग-माणगावकर बोळातील पडलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोघांचा मृत्यू झाल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने शनिवारी जीर्ण झालेल्या इमारतींबाबत कडक भूमिका घेतली. दिवसभरात १५ जुन्या इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शनिवारी दिवसभरात गावभागातील सहा घरांच्या भिंती ढासळण्याच्या स्थितीत असल्यामुळे त्यामधील रहिवाशांना घराबाहेर काढले. त्या इमारतींच्या भिंती जेसीबी व आपत्कालीन पथकाने पाडल्या. इमारतींच्या भिंती उतरवत असताना त्याठिकाणी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, उपमुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, नगर अभियंता संजय बागडे, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे शिवाजी जगताप, वाहन विभागाचे संजय कांबळे, आदी अधिकारी जातीने लक्ष ठेवून होते. यापुढे नगरपालिका प्रशासन जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतींच्या विरोधात कडक भूमिका घेणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली.
इचलकरंजीतील पंचगंगेचा पूर ओसरू लागला
By admin | Published: July 17, 2016 12:33 AM