इचलकरंजी : पाणीटंचाईमुळे हैराण झालेले नागरिक आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आल्याने या समस्येचे गांभीर्य वाढले आहे. शनिवारी दिवसभर आंदोलन करूनही पाण्याबाबत ठोस निर्णय मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना धक्काबुक्की केली. हा प्रकार म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील राजकीय स्टंट असल्याची चर्चा आहे.शहरास पंचगंगा व कृष्णा अशा दोन्ही नद्यांतून पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यामध्ये पंचगंगा नदीचे पाणी दूषित झाल्यानंतर फक्त कृष्णा नदीतून पाण्याचा उपसा केला जातो. कृष्णा नदीवर असलेल्या ५४० अश्वशक्तीच्या दोन्ही पंपामार्फत पाणी उपसा केल्यानंतर शहरास दररोज सुमारे ३२ दशलक्ष लिटर पाणी मिळते. मात्र, या योजनेवर असलेली गळती आणि चोरीमुळे दहा दशलक्ष लिटर पाणी कमी मिळते. शहराच्या जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत २२ दशलक्ष लिटर इतकेच पाणी पोहचते.सध्या पंचगंगा नदीतसुद्धा धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे तेथून १२५ अश्वशक्तीच्या पंपाद्वारे दहा दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा होतो. अशा प्रकारे कृष्णा व पंचगंगा या दोन्ही नद्यांमार्फत दररोज ३२ दशलक्ष लिटर मिळालेले पाणी शुद्ध करून शहरवासीयांना पुरविले जाते. त्यामुळे शहरास चार ते पाच दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा होतो. अशा स्थितीत कृष्णा नदीतील पाण्याची पातळी खालावल्यामुळे मजरेवाडी (ता.शिरोळ) येथील जॅकवेलच्या इंटकवेलचा व्हॉल्व्ह उघडा पडल्याने तेथील दोन्ही पाणी उपसा पंप बंद पडले. परिणामी पंचगंगा नदीमधून येणाऱ्या अवघ्या दहा दशलक्ष पाण्यावर शहराची गरज भागत नसल्याने कमालीची पाणीटंचाई नागरिकांना भेडसावत आहे.दोन्ही नद्यांमध्ये पाणी असूनसुद्धा प्रशासनाच्या नियोजनाअभावी पाणी मिळत नसल्याची भावना जनमानसांत पसरली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी रास्ता रोकोसारखी आंदोलने झाली. त्यापैकी शनिवारी मंगळवार पेठेतील संतप्त महिला-पुरूष नागरिकांनी दुपारी जुन्या नगरपालिकेजवळ रास्ता रोको केला. तेव्हा पालिकेच्या प्रशासनाकडून सायंकाळी पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, सायंकाळीसुद्धा पाणी मिळाले नसल्याने सहा वाजेपर्यंत वाट पाहणाऱ्या नागरिकांनी पुन्हा नारायण टॉकीजजवळ रास्ता रोको केला. सुमारे तासभर चाललेल्या रास्ता रोकोस नगरपालिकेकडून कोणताही अधिकारी किंवा पदाधिकारी त्याठिकाणी गेला नसल्याने संतप्त झालेले नागरिक जनता चौकात आले व तेथे रास्ता रोको केला.या आंदोलनास रात्री आठ वाजल्यानंतर नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार या दोघी सामोरे गेल्या. कृष्णा नदीतील पाणीटंचाईमुळे सोमवारपर्यंत नळाला पाणी येणार नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी या जमावाला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेले नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी दोघींना घेराव घालून ढकलाढकली केली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन तेथे उपस्थित असलेले माजी नगरसेवक सागर चाळके यांनी या दोघींना एका कापड दुकानात जाऊन थांबण्यास सांगितले. तरीसुद्धा नागरिकांनी दुकानासमोर बसून जोरदारपणे निदर्शने केली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर जमाव शांत झाला असला तरी त्यांनी पुन्हा या दोघींच्या गाड्यांनासुद्धा घेराव घातला.पालिकेच्या निवडणुका सहा महिन्यांत असल्यामुळे नगरसेवकपदासाठी इच्छुकांकडून अशी आंदोलने केली जात आहेत, ही राजकीय स्टंटबाजी असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने अशा राजकीय स्टंटबाजी आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या हुल्लडबाजीला आळा बसण्यासाठी जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवावा, अशी मागणी जाणकारांकडून होत आहे; अन्यथा अशा हुल्लडबाज आंदोलनांतून काही अगळीक झाल्यास त्याचे गांभीर्य अधिक वाढेल. (प्रतिनिधी)आजपासून पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठामजरेवाडी (ता. शिरोळ) येथे शनिवारी दुपारपासून कृष्णा नदीच्या डोहात यारीच्या सहाय्याने २२५ अश्वशक्तीचा सबमर्सिबल पंप सोडण्याचे काम सुरू झाले आहे. सुमारे साडेपाच टन वजनाचा हा अवजड पंप रात्री डोहात स्थापित होईल. त्याच्या विजेच्या केबल व पाण्याची दाबनलिका जोडून या पंपाची रविवारी उशिरा चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी यशस्वी झाल्यास आज, सोमवारपासून पाणीपुरवठा पूर्वीप्रमाणे होऊ लागेल. त्यानंतर तीन दिवसांतून एक वेळ असे जून महिन्यापर्यंत पाणी शहरवासीयांना मिळेल, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ यांनी दिली. त्याचप्रमाणे कर्नाटकला एक टीएमसी पाणी देण्यासाठी कोयना धरणातून सोडलेले पाणीसुद्धा कृष्णा नदीपात्रामध्ये रविवारी रात्री उशिरापर्यंत पोहोचेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इचलकरंजीत पाण्यावरुन राजकारण पेटले
By admin | Published: April 24, 2016 9:51 PM