रसिक, कलाकार, आयोजक, प्रेक्षक त्रस्त
अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहराच्या वैभवात भर घालणारे श्रीमंत घोरपडे नाट्यगृह सध्या दुरवस्थेत आहे. पूर्वीची आरामदायी बैठक व्यवस्था बदलून नव्याने केलेली आखूड (कंजेस्टेड) बैठक व्यवस्था प्रेक्षकांना त्रासदायक ठरत आहे. त्याचबरोबर वातानुकूलित यंत्रणा बंद पडली असून, साऊंड सिस्टीमही मोडकळीस आली आहे. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कलाकार, आयोजक, रसिक असे सर्वच घटक त्रस्त झाले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील दर्जेदार म्हणून नावाजलेले इचलकरंजी नगरपालिकेचे श्रीमंत घोरपडे नाट्यगृह बाहेरून येणाऱ्या सर्वच कलाकारांना भुरळ घालणारे ठरत होते. अनेक मोठमोठ्या कलाकारांनी या नाट्यगृहाचे कौतुक केले होते. परंतु हळूहळू या वैभवशाली नाट्यगृहाचे वैभव कमी होत गेले. सुरुवातीला मोठ्या व आरामदायी खुर्च्यांची बैठक व्यवस्था होती. शाळा, महाविद्यालयांच्या कार्यक्रमांमध्ये टवाळखोरी, दंगा यातून त्यांची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली. म्हणून नव्याने बैठक व्यवस्था तयार करण्यात आली. परंतु ती अतिशय आखूड स्वरुपाची बनली. त्यातूनही काही महिन्यातच अनेक खुर्च्यांच्या हातावरील प्लास्टिकचे आवरण निघून गेले. त्यामुळे लोखंडी पट्टीवर हात ठेवून बसावे लागते.
सध्या फक्त स्टेजवरील लाईट व्यवस्था व इतर दुरूस्तीसाठी सुमारे १९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याची दुरूस्ती वगळता इतर कामे प्रलंबित आहेत. नगरपालिकेने योग्य नियोजन केले असते, तर लॉकडाऊन कालावधीत मिळालेल्या वेळेत संपूर्ण दुरूस्ती झाली असती. स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून, त्याच्या दुरूस्तीचे काम लॉकडाऊनमध्ये करणे आवश्यक होते. साऊंड सिस्टीम व वातानुकूलित यंत्रणा (एसी) दुरूस्तीचा ठेका काढण्यात आला होता. त्यासाठी २२ लाख रुपयांची निविदा प्राप्त झाली होती. परंतु देखभालीच्या खर्चातील तफावतीमुळे मंजुरी मिळाली नाही. पुन्हा नव्याने ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे या किचकट प्रक्रियेतून काम होईपर्यंत प्रेक्षकांना व आयोजकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्या भुर्दंडापायी नगरपालिका भाड्यामध्ये सूट देत नाही.
ज्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, त्यांनाच बाहेरील साऊंड सिस्टीम व एसी मागवावे लागते. त्याचा भाड्यापेक्षा जास्त खर्च होतो. त्याऐवजी नाट्यगृहाचे एसी सुरू झाल्यास त्याचे भाडे नाट्यगृहालाच मिळते. पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व यंत्रणा अद्ययावत करावी, अशी मागणी होत आहे.
चौकट
अत्याधुनिक साऊंड सिस्टीम आवश्यक
सध्या अत्याधुनिक साऊंड सिस्टीमचा जमाना आहे. मोबाईल, ब्लूटुथ, हेडफोन यामध्येही डॉल्बीसदृश साऊंड सिस्टीम आली आहे. असे असताना, नाट्यगृहात जुनी-पुराणीच साऊंड व्यवस्था आहे. अनेकवेळा त्यामध्येही बिघाड होतो. परिणामी आयोजकांना किरकोळ कार्यक्रमालाही बाहेरहूनच साऊंड सिस्टीम घ्यावी लागते. त्यामुळे पालिकेने अत्याधुनिक साऊंड सिस्टीम बसवणे गरजेचे आहे. प्रतिक्रिया
अतिशय नावाजलेले व देखण्या असलेल्या नाट्यगृहाला सध्या अवकळा प्राप्त झाली आहे. लाईट, पडदे, साऊंड, एसी या सर्व बाबी साधारण २५ वर्षांपूर्वीच्या काळातील आहेत. आसन व्यवस्थाही तीन तास आरामदायी बसावी, अशी नाही. त्यामुळे रसिक कलाकारांना हे सर्व त्रासदायक ठरत आहे.
संजय होगाडे, आम्ही रसिक -आयोजक
फोटो ओळी १००२२०२१-आयसीएच-०१
नाट्यगृहाची इमारत