इचलकरंजी : येथील नगरपालिकेने सांगली पाटबंधारे विभागात दोन दिवसांपूर्वी ३० लाख रुपये भरले होते. तरीही थकबाकीची रक्कम मोठी असल्याने कृष्णा योजनेचा पाणी उपसा पाटबंधारे विभागाने मंगळवारी बंद केला. त्यामुळे नगरपालिकेने पुन्हा २० लाख रुपये भरून उपसा सुरू केला. त्यामुळे पाणीपुरवठा ठप्प होण्याची नामुष्की टळली.
इचलकरंजी नगरपालिकेचे सांगली पाटबंधारे विभागाची सन २०१६ पासूनची सुमारे नऊ कोटी रुपये थकबाकी आहे. या थकबाकीपोटी पालिकेने दोन दिवसांपूर्वी ३० लाख रुपये भरले होते. तरीही सांगली पाटबंधारे विभागाने मंगळवारी उपसा बंद केला. थकबाकीची रक्कम मोठी असल्याने पाटबंधारे विभागाने किमान ५ कोटी रुपये भरावेत, अशी मागणी होती. परंतु ही थकबाकी सन २०१६ पासूनची आहे. तसेच महावितरणचेही देणे आहे. पंचगंगेच्या उपसापोटी २० लाख रुपये कोल्हापूर पाटबंधारे विभागाला भरले. त्या तुलनेत वसुली कमी आहे. त्यामुळे एकावेळी एवढी रक्कम भरणे शक्य नाही. म्हणून पालिकेने दोन टप्प्यांत ५० लाख रुपये भरून उपसा सुरू करून घेतला आहे. त्यामुळे तूर्त कारवाई टळली असली तरी टांगती तलवार कायम आहे.
इचलकरंजीतील पाणीपुरवठ्याची समस्या वारंवार गंभीर बनत आहे. काळम्मावाडी, वारणा योजना बारगळल्या. दूधगंगा योजनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. पंचगंगा प्रदूषित आहे. कृष्णा योजनेला वारंवार गळती लागते. पाटबंधारे विभागाला पाणी उपश्याची रक्कम दिली जाते. तेवढे पाणी शहरापर्यंत पोहचत नाही. अशा सर्व प्रकारांतून पाणीपुरवठ्याचे गणित कोलमडत आहे.