लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील दुकाने तब्बल सव्वातीन महिन्यांनंतर उघडण्यात आली. त्यामुळे विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. चप्पलच्या दुकानातही रांगा लावून ग्राहक उभारले होते. मोबाईल, भांडी अशा दुकानांत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. बाजारात सर्वत्रच गर्दी झाली होती.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे ७ एप्रिलपासून दुकाने बंद करण्यात आली होती. त्यानंतर रुग्णसंख्येच्या प्रमाणात अत्यावश्यक सेवा काही वेळांकरिता सुरू होत्या, तर वैद्यकीय सेवा २४ तासांसाठी सुरू होत्या. अन्य सर्व प्रकारच्या आस्थापना बंदच ठेवण्यात आल्या होत्या.
परिणामी मोबाईल, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, भांडी, सुवर्णकार, स्टेशनरी, फूटवेअर अशा विविध साहित्यांची आवश्यकता असली तरी कारवाईमुळे खरेदीला मर्यादा होत्या. दुकाने उघडण्याबाबत आंदोलने झाली, इशारा दिला. या उठाठेवीत दोनवेळा शहरातील दुकाने काही वेळेसाठी उघड-झाक करण्यात आली; परंतु रीतसर परवानगी मिळाली नसल्याने बंदच राहिली. ती सोमवारपासून रीतसर सकाळी ७ ते ४ या वेळेत सुरू करण्यात आली. त्यामुळे आवश्यक खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. मुख्य मार्ग, चौक गजबजलेले होते. खरेदीच्या नादात नागरिकांना कोरोनाचा मात्र विसर पडल्याचे चित्र दिसून आले.
फोटो ओळी
१९०७२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजीत मलाबादे चौकातील मुख्य मार्गावर गर्दी झाली होती.
१९०७२०२१-आयसीएच-०५
इचलकरंजीत एका खासगी मॉलमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या.
सर्व छाया-उत्तम पाटील