इचलकरंजी : नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण निश्चित झाल्यानंतरच मँचेस्टर आघाडी स्वतंत्रपणे लढायचे की युती करायची, याबाबत निर्णय घेईल. शहर विकास आघाडी हा आमचा नैसर्गिक मित्र असून, परिस्थितीनुरूप योग्य तो निर्णय घेतला जाईल. स्वाभिमान व स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठीच ही आघाडी स्थापन केली आहे, अशी माहिती मँचेस्टर आघाडीचे अध्यक्ष सागर चाळके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शहर विकास आघाडीतील नाराजांची मँचेस्टर आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीची बैठक नुकतीच चाळके यांच्या निवासस्थानी पार पडली. बैठकीस आघाडीचे उपाध्यक्ष चंद्रकांत शेळके, सचिव प्रकाश मोरबाळे, नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, संजय तेलनाडे, रेखा रजपुते, मीना बेडगे यांच्यासह राजू रजपुते, धोंडिराम बेडगे, आदी उपस्थित होते.या बैठकीसंदर्भात माहिती देताना चाळके म्हणाले, बैठकीत नव्याने पडलेल्या प्रभागनिहाय आरक्षणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आघाडीकडे आजमितीला ३० इच्छुकांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. भविष्यातील राजकीय घडामोडी, अन्य पक्ष आणि आघाडी यांच्या व्यूहरचनेवरच रणनीती आखली जाईल. नगराध्यक्षांची निवड जनतेतून केली जाणार आहे; पण आमची आघाडी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगून चाळके यांनी आरक्षण निश्चितीनंतरच कोणत्या पक्षाशी अथवा आघाडीशी युती करायची किंवा स्वबळावर लढायचे, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. आघाडीच्या निर्णयाचे सर्वाधिकार सागर चाळके यांना देण्यात आले असून, चर्चेसाठी चंद्रकांत शेळके व प्रकाश मोरबाळे यांना अधिकार देण्यात आले आहेत. (वार्ताहर)
नगराध्यक्ष आरक्षणानंतरच इचलकरंजीत पुढील दिशा
By admin | Published: July 20, 2016 12:36 AM