इचलकरंजी : शासकीय कर्मचाºयांबरोबर नगरपालिका कर्मचाºयांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी येथील नगरपालिका कर्मचाºयांनी केलेले काम बंद आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले. त्यामुळे नगरपालिका कार्यालयात बुधवारी शुकशुकाट पसरला होता.
राज्यभरातील नगरपालिकांतील कर्मचाºयांनी सातवा वेतन आयोग, २४ वर्षाची कालबद्ध पदोन्नती, अनुकंपा धोरणाने नोकर भरती, कंत्राटी कामगारांचा प्रश्न निकाली काढावा, आदी मागण्या वारंवार केल्या आहेत. मात्र, शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल बुधवारी राज्यातील सर्व नगरपालिकांमधील कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते. त्याप्रमाणे बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर कामगार जमले. सर्व कामगार संघटनांच्या समन्वय समितीच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
यावेळी कामगार नेते ए.बी.पाटील, अण्णासाहेब कागले, शिवाजी जगताप, के.के.कांबळे, नौशाद जावळे, संजय कांबळे, सुभाष मोरे, संभाजीराव काटकर, आदींची भाषणे झाली. धनंजय पळसुले, हरी माळी, विजय पाटील, संजय शेटे, दस्तगीर सादुले, आदी कामगार नेत्यांबरोबरच पालिकेतील विविध विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कामगार संघटनांच्या समन्वय समितीच्यावतीने यावेळी नगराध्यक्षा अॅड. अलका स्वामी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कामगारांच्या मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती यावेळी नगराध्यक्षांनी दिली.आंदोलनामुळे जॉगिंग ट्रॅक बंद
नगरपालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या उद्यानांतून सकाळी फिरण्यासाठी येणाºया नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. नेहमीप्रमाणे नागरिक फिरावयास आले असताना उद्यानांच्या प्रवेशद्वारांना कुलूप लावण्यात आल्यामुळे काही नागरिक घरी परतले. तर अनेकांनी रस्त्यांवर फिरणे पसंत केले.