इचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणारी कृष्णा नळ योजना बंद पडल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या विरोधात शहरात शुक्रवारी चार ठिकाणी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामध्ये महिला व लहान मुले रिकाम्या घागरी घेऊन सहभागी झाले होते. आंदोलनामुळे नगरपालिकेचे पदाधिकारी आणि पोलिस यंत्रणेची धावपळ झाली.मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी खालावल्यामुळे तेथून शहरासाठी उपसा होत असलेले दोन्ही पंप दोन दिवसांपासून बंद पडले आहेत, तर पंचगंगा नदीतील पाण्याचा उपसा करणारा एकच पंप सुरू आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारा उष्मा आणि त्यातच निर्माण झालेली पाणीटंचाई याच्या विरोधात नागरिकांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. मुख्य रस्त्यावरील गांधी कॅम्प, संभाजी चौक, मंगळवार पेठ, जनता चौक, आदी ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अचानकपणे रास्ता रोको केला. जनता चौकात झालेल्या आंदोलनाच्या ठिकाणी पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ व जलअभियंता ए. एन. जकीनकर यांनी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली. पाणी आल्यानंतरच आम्ही रस्त्यावरून उठू, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. जलअभियंता जकीनकर यांनी आंदोलन झालेल्या ठिकाणी नळाला पाणी सोडले. (प्रतिनिधी)नगरपालिकेकडून जमावबंदीची मागणीआगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टंटबाजी करणाऱ्या तथाकथित नेतेमंडळींना आणि त्यांच्याकडून घडविण्यात येणाऱ्या रास्ता रोकोसारख्या आंदोलनावर नियंत्रण यावे म्हणून नगरपालिका क्षेत्रात जमावबंदीचे कलम पुकारण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन नगरपालिकेच्यावतीने देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जमावबंदी लागू झाल्यास अशा बोगस आंदोलनांना आपोआपच आळा बसेल. ज्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत राहील. राजकीय स्टंटबाजीपाणीटंचाईच्या विरोधात अचानकपणे झालेल्या या आंदोलनामागे स्थानिक पातळीवरील काही स्वयंघोषित नेतेमंडळी सक्रिय असल्याचे चित्र दिसून आले. पाण्याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नगरपालिकेतून न घेता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय स्टंट करणाऱ्या काही मंडळींनी हेतुपुरस्सर लोकांना वेठीस धरल्याचा प्रकार घडल्यामुळे वाहनधारकांमध्ये आणि एसटीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून संताप व्यक्त होत होता.
इचलकरंजीत पाणीटंचाईच्या विरोधात अचानक रास्ता रोको
By admin | Published: April 23, 2016 1:23 AM