लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरालगत असलेल्या कबनूर (ता. हातकणंगले) या गावात उरुसावेळी लावण्यात येणारी खेळणी व विविध प्रकारच्या स्टॉलपासून ग्रामपंचायतीला साडेसतरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असतानाच इचलकरंजीत मात्र गणेश फेस्टिव्हलमध्ये खेळणी व स्टॉलमधून नगरपालिकेला अवघे दोन लाख रुपयांचेच उत्पन्न मिळत असल्याबद्दल नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. कबनूर उरूस आणि इचलकरंजी फेस्टिव्हल याचीच चर्चा गेलेदोन दिवस नगरपालिका वर्तुळात आहे.कबनूर (ता. हातकणंगले) येथे गुढीपाडव्याच्या सणादरम्यान आठवड्याभराचा उरूस असतो. उरूसावेळी विविध प्रकारची खेळणी, वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉलही उभारले जातात. अशा या खेळणी व स्टॉलमधून आठवड्याभरात साडेसतरा लाख रुपयांहून अधिक बाजार कराचे उत्पन्न कबनूर ग्रामपंचायतीला मिळते.इचलकरंजीतील गणेश चतुर्थीच्या सणावेळी दहा दिवसांचा गणेश फेस्टिव्हल श्रीमंत घोरपडे नाट्यगृहामध्ये साजरा होतो. त्यावेळी श्रीमंत घोरपडे चौक ते सुंदर बाग या दरम्यान विविध प्रकारची खेळणी आणि खाद्यपदार्थ व अन्य वस्तू विकणारे स्टॉल उभारले जातात. अशा दहा दिवसांसाठी श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकातील जागा बाजार कराच्या वसुलीसाठी लिलाव पद्धतीने ठेका दिला जातो. अशा प्रकारचा ठेका इचलकरंजी नगरपालिकेने लिलावामध्ये अवघ्या दोन लाख रुपयांना दिला. कबनूर छोटेसे गाव. याउलट इचलकरंजी मोठे शहर. या दोन्हीही गावांमध्ये भरविण्यात आलेले उरूस आणि फेस्टिव्हल यांच्या बाजार कराच्या वसुलीत तब्बल पंधरा लाखांची तफावत पाहता याचीच उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. लिलाव पद्धतीने ठेका देण्याऐवजी नगरपालिकेच्या यंत्रणेमार्फत फेस्टिव्हलमधील खेळणी व स्टॉलधारकाकडून बाजार कराची वसुली व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.१५०० किलोची बिर्याणी आणि ठेका ‘मॅनेज’नगरपालिकेमध्ये फेस्टिव्हलबाबत झालेल्या लिलाव प्रक्रियेच्या वेळी प्रक्रियेचा सोपस्कार पूर्ण करून तिघेजण सहभागी झाले होते. मात्र, या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पाचजणांना सोपस्कार पूर्ण करता आले नाही. नगरपालिकेच्या यंत्रणेने लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येऊ नये म्हणून या पाचजणांना लिलाव प्रक्रियेपासून दूर ठेवले. याचाच अर्थ फेस्टिव्हलबाबतचा बाजार कराचा ठेका ‘मॅनेज’ करण्यात आला होता, असा आरोप त्यावेळी करत असतानाच जिल्हाधिकाºयांपर्यंत तक्रार करण्याची भाषा प्रक्रियेपासून दूर राहिलेल्या अर्जदारांनी केली होती. मात्र, संबंधित नंतर ‘मॅनेज’ झाल्याची चर्चा आहे, तर १५०० किलो तांदूळ मसाले भातासाठी घेऊन हा ठेका ‘मॅनेज’ केल्याचेही बोलले जात आहे.
इचलकरंजीत कर तफावतीची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 11:43 PM