इचलकरंजी : येथील चंदूर रस्त्यावरील जामदार मळा परिसरातून जात असताना एका इलेक्ट्रिक मोपेडने पेट घेतला. या अचानक घडलेल्या घटनेत मोपेडस्वार रितेश कमलेश केसरवाणी याने प्रसंगावधान दाखवत मोपेड रस्त्याकडेला लावून बाजूला झाला. तेथूनच जाणाऱ्या चौघा तरुणांनी पेटलेल्या मोपेडवर पाणी मारत आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला.
रितेश हे जामदार मळा परिसरात राहण्यास असून, रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास इलेक्ट्रिक मोपेडवरुन गोडावूनमधील काम आटोपून घराकडे निघाले होते. जामदार मळा परिसरात आले असता अचानक मोपेडने पेट घेतली. काही कळायच्या आतच आग मोपेडवर सर्वत्र पसरू लागली. या वेळी रितेश यांनी प्रसंगावधान दाखवत मोपेड रस्त्याकडेला लावली. या वेळी परिसरातील एका खासगी हॉस्पिटलमार्गे चंदूरकडे मोटरसायकलवरुन जाणाऱ्या अशोक कांबळे, उमेश चव्हाण, स्वप्निल गोरे, आशुतोष भाईमाने या चौघा तरुणांनी ही घटना पाहिली. त्यांनी कोणत्याही गोष्टीचा विलंब न लावता पेट घेतलेल्या मोपेडवर पाण्याने जोराचा मारा केला. त्यामुळे ही आग आटोक्यात येऊन पुढील अनर्थ टळला. यामध्ये मोपेडचे मोठे आर्थिक नुकसान झाले. रितेश यांनी काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिक मोपेड खरेदी केली. अचानक मोपेडने पेट घेतल्याने नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. या वेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
फोटो ओळी
२६०९२०२१-आयसीएच-०६
इचलकरंजीत इलेक्ट्रिक मोपेडने अचानक पेट घेतला.