विश्वास पाटील कोल्हापूर : बँकेत खाते नाही, पैसेही थेट बँकेला दिलेले नाहीत. तरीही लोकांना ‘निवारा टेस्टामेंटरी ट्रस्ट अँड एनजीओ’ने चक्क आयडीबीआय बँकेच्या पुण्यातील लोकमान्यनगर शाखेच्या धडधडीत खोट्या पावत्या दिल्या आहेत. या पावत्यांची मुदत एप्रिलमध्ये संपल्यावर लोकांनी बँकेत जाऊन चौकशी केल्यावर पावत्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले; परंतु, एखादा ट्रस्ट बँकेच्या नावाचा असा गैरवापर करून लोकांची फसवणूक करत असताना आयडीबीआय बँकेनेही त्याची फारशी दखल घेतलेली नाही, याचेच आश्चर्य आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आयडीबीआय बँकेच्या लोकमान्यनगर शाखेशी संपर्क साधला; परंतु, फोन कुणी उचलला नाही.ज्यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात या ट्रस्टच्याविरोधात तक्रार दिली त्या सचिन देसाई यांनी ३,९०० रुपये ट्रस्टकडे जमा केल्यावर त्यांना ट्रस्टने आयडीबीआय बँकेची ठेवपावती दिली आहे. प्रत्यक्षात ती ठेवपावती नाहीच. सुविधा रक्कम जमा झाल्याची पावती, असे त्यात म्हटले आहे. म्हणजे या पावतीचा खोटेपणा तिथूनच सुरू होतो. प्रत्यक्षात ती पावती कुणालाही खरी वाटावी, अशीच आहे. त्यात बँकेचा रीतसर लोगो वापरला आहे. बँकेचा पत्ताही आहे. फोन नंबरही वापरला आहे; परंतु, तो सध्या बंद आहे. त्यातील पावतीचा नंबर ०९२४७५१ असा आहे. १८ ऑक्टोबर २०२१ ला त्यांना ही ठेवपावती दिली आहे. तिची मुदत १८ महिन्यांची होती. ती १८ एप्रिल २०२३ ला संपली. त्याचा वार्षिक व्याज दर ७.१५ टक्के आहे. जमा रक्कम पाच कोटी ३५ लाख ७५ हजार रुपये असून मुदतीनंतर परत मिळणारी रक्कम मात्र पाच कोटी ९३ लाख २० हजार ९२८ इतकी आहे. एवढी रक्कम ट्रस्टकडे जमा असल्याचे त्यातून भासवले आहे. त्या पावतीच्या मागे श्रृती ठाकरे रिलेशनशीप मॅनेजर (ईआयएन१०७६७१- ३० जुलै २०२२) असे नाव असून त्यावर पेनाने सही केली आहे. ठेवपावती आपल्या नावे असल्याने देसाई यांनी आयडीबीआय शाखेच्या शाहुपुरी, राजारामपुरी आणि महाद्वार शाखेत जाऊन चौकशी केली. सातारा मुख्य कार्यालयातही ते जाऊन आले. पुण्यातील संबंधित शाखेतही ते गेले. बँकेतील अधिकाऱ्यांनी त्यांना याच्याशी बँकेचा काडीमात्र संंबंध नाही. तुम्ही बँकेत आलेला नाही. ठेव ठेवलेली नाही आणि बँक तुम्हाला कुठले पैसे देणार, अशी विचारणा करून बाहेर काढले; परंतु, बँकेच्या नावावर असा व्यवहार कोण करते, याची चौकशी मात्र त्यांनी स्वत:हून करायला हवी होती. तसे घडलेले नाही.
ठेवपावत्या करताना मखलाशी...
या लोकांना ज्या ठेवपावत्या दिल्या आहेत, त्या करतानाही ट्रस्टने मखलाशी केली आहे. नोटरी करण्यासाठी म्हणून लोकांना बोलवले. त्यांना दिलेल्या ठेवपावत्या आपल्याकडे काढून घेतल्या. नोटरी झाल्यावर त्या लगेच परत करतो, असे सांगितले. नोटरी करताना मात्र सह्या करण्यासाठी पूजा भोसले आल्याच नाहीत. त्यामुळे त्यांच्या सह्या झाल्यावर ठेवपावत्या परत देतो, असे सांगून त्या पावत्या ट्रस्टने आपल्याकडे ठेवल्या आहेत.