कोल्हापूर : वरणगे पाडळी येथील आयडीबीआय बँकेत झालेल्या घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले तत्कालीन शाखा व्यवस्थापक जयंत गंदे व वकील सी. जी. कुलकर्णी यांनी घोटाळा केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी दोषारोपपत्र सादर केले जाणार असल्याची माहिती ‘करवीर’चे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी दिली.
बोगस पीककर्ज आणि पाईपलाईनसाठी कर्जप्रकरणे मंजूर करून आयडीबीआय बँकेची सुमारे आठ कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार बँकेच्या अधिकाऱ्यांनी करवीर पोलिसांत दिली आहे. २७ आॅक्टोबर २०१६ ते ३ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला होता. बँकेच्या अन्य सुमारे ४५० खातेदारांनी या प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी गंदे व कुलकर्णी यांना पोलिसांनी अटक केली असून, त्याची पोलीस कोठडी १३ मे रोजी संपली. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
खातेदारांच्या नावावर एक गुंठाही जमीन नसताना बनावट सर्च रिपोर्ट, कागदपत्रांची तपासणी न करणे, प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी न करता बोगस पीककर्ज व पाईपलाईन कर्जप्रकरणे मंजूर केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले. त्यांच्याकडे मिळालेल्या मोबाईल कॉल डिटेल्सवरून आणखी काहींची नावे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे कांबळे यांनी सांगितले.