कोल्हापूर : छत्रपती शिवरायांनी मानसिक गुलामगिरीतून मोकळे करीत स्वराज्य निर्मितीसाठी सामान्यांतील सामान्य माणसे एकत्रित केली. त्यांचे कान्होजी जेधे, शिवा जंगम, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी पालसकर हे नि:स्वार्थी, प्रामाणिक मावळे म्हणजे राष्ट्रीय चारित्र्याचे आदर्श उदाहरण आहेत, असे प्रतिपादन इतिहासतज्ज्ञ डॉ. अमर आडके यांनी केले.कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (के. एम. ए.)तर्फे केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित व्याख्यानमालेत शनिवारी ते ‘नरवीर तानाजी मालुसरे’ या विषयावर बोलत होते. सुरुवातीला ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले व राजर्र्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते अवयवदान कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी ‘केएमए’चे अध्यक्ष डॉ. प्रवीण हेंद्रे, डॉ. संगीता निंबाळकर, डॉ. राजकुमार पाटील उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील तानाजी मालुसरे यांचे स्थान अधोरेखित करताना डॉ. आडके म्हणाले, तानाजी मालुसरे तीस वर्षे महाराजांच्या पाठीमागे सावलीसारखा उभा राहिला. त्यांचे कर्तृत्व फक्त ‘कोंढाण्या’पुरतेच मर्यादित नव्हते; तर स्वराज्याच्या अनेक लढायांत त्यांचा वाटा सिंहाचा होता. ‘लोकमत’चे संपादक भोसले म्हणाले, वेगाने बदलत्या समाजजीवनात आरोग्याच्या सर्व संकल्पनांचा फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. आरोग्य हे शरीराचे महत्त्वाचे अंग आहे. तंदुरुस्त आरोग्य असेल तर मनही तंदुरुस्त राहील. सजग समाजासाठी केएमएचे उपक्रम स्तुत्य आहेत. डॉ. आर. एम. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. क ोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित व्याख्यानमालेत शनिवारी अवयवदान उपक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले व डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून केएमएचे अध्यक्ष डॉ. प्रवीण हेंद्रे, डॉ. रवींद्र शिंदे, सचिव डॉ. आर. एम. कुलकर्णी, डॉ. राजकुमार पाटील, डॉ. अमर आडके, डॉ. संगीता निंबाळकर उपस्थित होते.
शिवरायांचे मावळे चारित्र्याचे आदर्श उदाहरण
By admin | Published: October 09, 2016 12:41 AM