उचगाव : फासेपारधी समाजाने सामाजिक बांधिलकीने लग्नसोहळ्यातील खर्चाला फाटा देत उचगाव कोविड सेंटरला केलेली मदत आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार आमदार ऋतुराज पाटील यांनी काढले.
उचगाव (ता. करवीर) पूर्व येथील शांतीनगर फासेपारधी वसाहतीतील रजत काळे व अपूर्वा चव्हाण या जोडप्याचा विवाह आमदार ऋतुराज पाटील व माजी सरपंच गणेश काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या दाम्पत्याने लग्नसोहळ्यात डामडौल न करता त्यावरील खर्च टाळून येथील कोविड सेंटरला मदत केली. यावेळी सरपंच मालूताई काळे, मधुकर चव्हाण, दिनकर पोवार, दीपक रेडेकर, ग्रामविकास अधिकारी अजितकुमार राणे उपस्थित होते.
चौकट:
उचगावच्या लोकनियुक्त सरपंच मालूताई काळे, माजी सरपंच गणेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली फासेपारधी समाजाने संपूर्ण दारुबंदी, बळीची प्रथा बंद करून शाकाहारी यात्रा, वृक्षारोपण, सामुदायिक लग्नासारखे एकाहून अधिक क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. माजी सरपंच गणेश काळे यांनी याकामी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले.
फोटो : २८ उचगाव लग्न
ओळी : उचगाव - शांतीनगर फासेपारधी वसाहतीने कोविड सेंटरला धान्य स्वरूपात मदत केली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, गणेश काळे, मालूताई काळे, वधू-वर व मान्यवर उपस्थित होते.