संदीप बावचे - जयसिंगपूर -एखादी गोष्ट मनात आणली की ती तडीस नेऊन पूर्ण करायची, गाव विकासासाठी एकजूट दाखवायची. शिरोळ तालुक्यातील अशीच कोथळी या गावाने एकी दाखवून वडापमुक्त गाव म्हणून जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे. गेली अकरा वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे. दर अर्ध्या तासाला एस.टी. बसची फेरी असल्यामुळे गावकऱ्यांचा प्रवास सुखकर बनला आहे. कृष्णा-वारणा संगमाच्या काठावर शिरोळ तालुक्याच्या उत्तरेकडील शेवटचे गाव म्हणून कोथळीची ओळख आहे. टोमॅटो उत्पादनात एकेकाळी दबदबा असलेल्या गावाने तंटामुक्त पुरस्कार, स्वच्छता अभियानाचा पुरस्कार प्राप्त केला आहे. लोक सहभागातून अक्षयप्रकाश योजनाही राबवून आदर्शवत असे काम केले. याच गावाने सन २००४ पासून वडापमुक्त गावची गुढी उभारली. अनेक वर्षांपासून वेळेत एस.टी. न येणे, खासगी वाहनांची गर्दी यामुळे ग्रामस्थांनी एकजुटीने खासगी वाहतुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेऊन पोलीस ठाण्याला निवेदन देऊन ही वाहतूक बंद करण्यास भाग पाडले. कुरुंदवाड एस.टी. आगार प्रमुखांना निवेदन देऊन एस.टी.च्या जादा फेऱ्या सुरू करण्याबाबत विनंती केली. त्यावेळचे सरपंच धनगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली वडापमुक्तीचा हा संकल्प पूर्ण झाला. कोथळी-जयसिंगपूर-कोथळी अशी दर अर्ध्या तासाला सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत एस.टी. बससेवा सुरू झाली. कुरुंदवाड आगाराने गावासाठी दोन एस.टी. बसेस दिल्या. सकाळी लवकर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी एक मुक्कामी एस.टी.सुद्धा सुरू ठेवली आहे. जिल्ह्यात गावागावांत खासगी वाहतूक सुरू असताना कोथळीकरांनी आदर्श निर्माण करून एकजुटीचे दर्शन दिले आहे. प्रवाशांना चांगली सेवा मिळत आहेच शिवाय शासनाला एसटीच्या माध्यमातून लाखो रुपयांचा महसूलदेखील मिळू लागला आहे. मध्यंतरीच्या काळात चालक व वाहक यांची कारणे सांगून एस.टी.च्या फेऱ्या कमी करण्याचा प्रकार सुरू झाला होता. मात्र, ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व तटामुक्तसमितीने हा प्रकार हाणून पाडला. जयसिंगपूर एस.टी. बसस्थानकात ठिय्या आंदोलन करून एस.टी.बसची सेवा सुरळीत केली. यामुळे ग्रामस्थांचा या यत्रणेवर अंकुश किती आहे, हे समजून येते. एकूणच या एकजुटीच्या वडापमुक्त गाव संकल्पनेप्रमाणेच ग्रामस्थांनी सर्वच क्षेत्रांत विकासाच्या दृष्टिकोणातून एकजूट कायमपणे ठेवावी, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे.कोथळी गावाने नेहमीच आदर्शवत काम केले आहे. स्वच्छता अभियान असो, तंटामुक्त अभियान असो गावकऱ्यांचा नेहमीच प्रतिसाद मिळतो. गेली अकरा वर्षे या संकल्पामध्ये सातत्य ठेवले आहे, हे विशेष. - धनगोंडा पाटील, माजी सरपंच गावाने घेतलेला निर्णय आदर्शवत आहे. कुरुंदवाड आगाराच्या सहकार्याने ही संकल्पना गावामध्ये चांगल्याप्रकारे सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांचा प्रवास अल्पदरात व सुखकर बनला आहे. - बेबीजहिरा तांबोळी, सरपंचएस.टी.च्या सर्वाधिक फेऱ्या असणारे तालुक्यातील कोथळी हे एकमेव गाव आहे. यामुळे प्राधान्याने या गावासाठी सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असतो.एस.टी. आगाराच्या उत्पन्नातही भर पडली आहे. - एम. बी. भंडारे, आगारप्रमुखविनाफलक थांबाजयसिंगपूर येथील एसटी स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस कोथळीला जाण्यासाठी एस.टी. बसथांबा करण्यात आला आहे. मात्र, या थांब्यासमोर विनापरवाना वाहन पार्किंग केली जात असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय या ठिकाणी कोथळी बसथांबा असा फलकही नाही. याकडे कुरुंदवाड एस.टी. आगार प्रमुखांनी लक्ष देण्याची गरज आहे.
अकरा वर्षे वडाप मुक्तीतून कोथळीचा आदर्श
By admin | Published: April 29, 2015 9:41 PM