लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करताना शासन निकषानुसारच अवघड क्षेत्र निश्चित करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघटनेने जिल्हा परिषदेकडे केली. संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, शिक्षण सभापती रसिका पाटील व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शासनाच्या ७ एप्रिलच्या आदेशानुसार जिल्हांतर्गत बदली धोरणांमध्ये अवघड क्षेत्रातील शाळा निवडताना कोणते निकष असावेत याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. सदर निकषांनुसार जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा निवडण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आली होती. मात्र १४ जुलै २०२१ च्या जिल्हा परिषद कार्यालयाकडील पत्रान्वये अवघड क्षेत्रातील शाळांचे फेर सर्वेक्षण करण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. तरी शासनाने दिलेल्या निकषात कोणताही बदल न करता अवघड क्षेत्रातील शाळा घोषित कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली.
त्याचबरोबर इतरही मागण्या शिष्टमंडळाने केल्या. यावेळी राज्य संघटक पी. आर. पाटील, जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, सरचिटणीस शंकर पवार, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पोवार आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करताना शासन निकषानुसारच अवघड क्षेत्र निश्चित करावे, या मागणीचे निवेदन पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांना सोमवारी दिले. यावेळी पी. आर. पाटील, प्रसाद पाटील, एस. के. पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-१९०७२०२१-कोल-पुरोगामी शिक्षक)