कागल : एका खासगी दूरचित्रवाणी (टीव्ही चॅनेल)वर दाखविण्यात येणाऱ्या ‘चेहरा ओळखा’ या स्पर्धेच्या माध्यमातून १३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या नैराश्येतून पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथील महेश रामचंद्र सूर्यवंशी (वय ४३) यांनी सोमवारी स्वत:च्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये आपली फसवणूक होऊनही मुख्यमंत्री, इतर मंत्री, पोलिसांनी तक्रार करूनही साधी दखल घेतली नाही, असे सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास उघडकीस आला. महेश सूर्यवंशी हे पत्नी, दोन मुलांसह पिंपळगाव खुर्द येथे राहत होते. ते खासगी कंपनीत कामावर होते, तर पत्नी गावात पिग्मी गोळा करते. सहा महिन्यांपूर्वी एका चॅनेलवर चेहरा ओळखा स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला. अमिताभ बच्चन आणि विराट कोहली हे दडलेले चेहरे सूर्यवंशी यांच्या मुलाने ओळखले. त्यांनी संबंधित जाहिरातीत दिलेल्या नंबरवर फोन करून माहिती दिली. त्यानंतर दोन दिवसांत त्यांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला आणि ‘तुम्ही ही स्पर्धा जिंकली असून, कोट्यवधी रुपयांचे बक्षीस लागले आहे. मात्र, त्यासाठी कंपनीच्या बॅँक खात्यावर एक हजार रुपये भरून खाते उघडा’, असा निरोप दिला. जून २०१५ मध्ये ही घटना घडली. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून आॅक्टोबर २०१५ पर्यंत टप्प्याटप्प्याने १३ लाख ४० हजार रुपये या भामट्यांनी मोठ्या रकमेचे आमिष दाखवून सूर्यवंशी यांच्याकडून उकळले. हे पैसे स्टेट बॅँक कागल शाखा आणि पंजाब नॅशनल बॅँक (कोल्हापूर) येथे त्यांनी भरले. सूर्यवंशी यांनी सर्व पावत्या, संबंधित व्यक्तीचे फोन क्रमांक नोंद करून ठेवले. यानंतरही या व्यक्ती त्यांच्याकडे पैसे मागतच होत्या. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी दाद मागण्याचा प्रयत्न केला. त्यातून ते निराश झाले होते. या नैराश्याच्या गर्तेतच सोमवारी सकाळी मुले शाळेला गेल्यानंतर आणि पत्नी पिग्मी गोळा करण्यासाठी गेल्यानंतर घराच्या खिडकीला सुताची लहान दोरी बांधून त्यांनी हा गळफास घेतला. पत्नी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पत्ता बोगस बॅँक खात्यावर पैसे वर्ग होतील, या आमिषाने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महेश सूर्यवंशी हे संबंधित चॅनेलच्या मुंबई कार्यालयातही जाऊन आले होते. तेथे कंपनीचा पत्ता देण्यात आला. मात्र, तो पत्ताच बोगस असल्याचे निदर्शनास आले. संबंधितांनी दिलेले मोबाईल क्रमांक कायमचे स्विच आॅफ लागत होते. घर विक्रीला काढले... मोठ्या रकमेच्या आशेने महेश यांनी सुरुवातीला स्वत: जवळील बॅँक बॅलेन्स संपविला. नंतर दागिने विकून व उधारीच्या पैशातून उलाढाल करीत एकूण १३ लाख ४० हजार रुपये भरले. उलाढाल केलेली रक्कम भरण्यासाठी इतरांनी तगादा लावल्यानंतर अलीकडे राहते घर त्यांनी विक्रीसाठी काढले. या प्रकरणामुळे निराशेने सर्व कुटुंबच गेले काही दिवस तणावाखाली होते. महेश यांचा मुलगा सहावीला, तर मुलगी आठवीला आहे. आत्महत्या अन् चिठ्ठी आपल्याला न्याय मिळावा म्हणून महेश यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे अर्ज केले होते. त्यात आपल्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे, असेही सूचित केले होते. दरम्यान, कागल पोलिसांचे म्हणणे आहे की, अशी कोणतीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी हा उल्लेख केला आहे.
चेहरा ओळखा’त फसला; जीव गमावून बसला
By admin | Published: February 02, 2016 1:17 AM