कोतोली : मसाई पठाराच्या पायथ्याशी वास्तव्यास असलेल्या पोवारवाडी, मानकात्रेवाडी, दळवेवाडी, भाचरवाडी, धनगरवाडा, घुंगुर, इंजुळे, खडेखोळ आदी वाड्यांची ओळख आजही हमालांच्या वाड्या म्हणून होती. ती हमालांनी शेतकरी, नोकरदार अशी केल्याने चर्चेचा विषय बनू लागला आहे.या वाड्या नदीकाठापासून लांब असल्याने येथील शेती ओली होणार कशी? यामुळे बांधारी परिसरातील वाड्यामध्ये जन्माला येणाऱ्या बाळाच्या पाचवीलाच पेनाऐवजी दाबण, हुक पुजले जायचे. अशातच गावात शाळांची वानवा. यामुळे शाळा शिकण्याऐवजी कोल्हापुरात लक्ष्मीपुरी, मार्केट यार्ड, हॉटेल आदी ठिकाणी हमाली करायची. महिला जनावरे सांभाळून पावसाच्या पाण्यावरची शेती करायच्या. लहान मुले हॉटेल, किराणा दुकानात कामाला जायचे. या वाड्या उंच भागात असल्याने तळपठारावरील हिरवी शेती नजरेस पडते. पाहुण्याकडे गेल्यावर ऊस, मका, भुईमूग पाहून आनंदी व्हायचे. मुलांना कुतूहल वाटायचे. बांधारीला १० वर्षांपूर्वी मानकात्रेवाडीतील प्रगतिशील शेतकरी श्रीपती पाटील यांनी प्रथम बोअर मारुन मका, शाळू पिके घेतली. हा प्रयोग बांधारीच्या ६० टक्के लोकांनी सध्या अंमलात आणला असून हजार एकर शेती ओलिताखाली आणली आहे. यात मका, ऊस, भुईमूग, सूर्यफुल पिके घेण्यात येतात.शिंदेवाडी येथील शेतकऱ्यास ४ लाखांची गुळाची पटी मिळाली आहे. असे बांधारीच्या हमालांनी बोअरच्या पाण्यावर शेती केली आहे. ओसाड पडणारे शेत सध्या हिरवेगार पहावयास मिळत आहे. रामचंद्र पोवार यांनी शिक्षणसंस्था काढली आहे. गावागावातील तरुण नोकरी करत शेती करत आहेत. यामुळे बांधारीचे हमाल शेतकरी बनू लागले आहेत.
हमालांच्या वाड्यांची ओळख पुसली
By admin | Published: March 21, 2017 11:50 PM