लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोठेही सभा व सामूहिक भेटीगाठी होणार नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. प्रत्येक ठरावधारकांशी वैचारिक भांडवली गुंतवणूक झालेली आहे. प्रत्येकाला पॅनलची ध्येयधोरणे मिळालेली आहेत, त्यामुळे फारसा प्रचार करावा लागणार नसल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले,
डोणोली (ता. शाहूवाडी) येथील सुभाष पाटील यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. ते जिल्हा बँकेचे कर्मचारी असल्याने नेहमी गर्दीत असल्याने त्यातून संसर्ग झाला असावा मात्र त्यांचा मृत्यू ‘गोकुळ’ निवडणुकीशी जोडून राजकारण चालू आहे. पराभव समोर दिसू लागल्यानेच सत्तारूढ गटाचा खटाटोप सुरू आहे. गोकुळच्या निवडणुकीत आपण सकारात्मक मुद्दे घेऊन जात आहे. दूध उत्पादकांना दोन रुपये जादा मिळावेत, ‘अमूल’ पेक्षाही ‘गोकुळ’ मोठा करायचा आहे. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार कोणत्याही राज्यातून आपण दूध आणू शकतो, मग मल्टीस्टेटची गरज काय? असा सवालही त्यांनी केला.
वेळ आल्यावर नोकरभरतीवर बोलू
‘गोकुळ’च्या कारभाराबाबत दूध उत्पादकांमध्ये असंतोष आहे. भ्रष्टाचारासह इतर मुद्यांवर आपण काही बोललो नाही. निवडणुकीला रंग आल्यानंतर भ्रष्टाचारासह नोकर भरतीतील अर्थकारणावर बोलू, असा इशारा मंत्री मुश्रीफ यांनी दिला.
मुन्ना-बंटीच्या वादात पडलो नसतो
सुभाष पाटील यांच्या मृत्यूवरून सतेज पाटील व धनंजय महाडिक यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आपण पडलो नसतो, मात्र पाटील जिल्हा बँकेचे कर्मचारी असल्याने त्यावर बोलल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.