इंदुमती गणेश -- कोल्हापूर --प्लास्टर आॅफ पॅरिसची गणेशमूर्ती विरघळत नसल्याने आजवर या मूर्तींच्या खरेदी-विक्रीवर आक्षेप व्यक्त केला जात होता. मात्र मूर्तीच्या वजनाइतकाच खायचा सोडा पाण्यात मिसळला तर ही मूर्ती अवघ्या दोन तासांत विरघळते, असे संशोधन पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने केले आहे. हे विरघळलेले प्लास्टर आॅफ पॅरिस नापीक जमिनीसाठी उत्तम पोषण असल्याचेही सिद्ध झाले आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसने बनविलेल्या गणेशमूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत; शिवाय त्यावरील विषारी रंग जलप्रदूषणाला कारणीभूत ठरतात. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने मूर्ती शाडूच्याच असाव्यात, असा निर्णय दिला होता. मात्र शाडूची अनुपलब्धता आणि त्यामुळे होणारे जंगलांचे नुकसान पाहता शासनाने उत्खननावर बंदी आणली आहे. त्यामुळे कुंभार बांधवांना गणेशमूर्ती घडविण्यासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसचाच वापर करावा लागतो. त्यावर पर्याय म्हणून गेल्या चार-पाच वर्षांत पर्यावरणप्रेमी, महापालिका व जिल्हा प्रशासनाने मूर्तिदानाची हाक दिली. त्याला कोल्हापूरकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि दरवर्षी ४० हजारांहून अधिक गणेशमूर्ती दान होतात. मात्र दान केलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाचाही प्रश्न निर्माण होतोच; त्यामुळे त्यावर शाश्वत उपाय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.पुण्यातील नॅशनल लॅबोरेटरीने खाण्याच्या सोड्याचा वापर करून प्लास्टर आॅफ पॅरिसची मूर्ती दोन तासांत विरघळविण्याची किमया साधली आहे. त्यांचा हा प्रयोग कोल्हापुरातील पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड व निसर्गमित्र संस्थेने प्रत्यक्षात करून पाहिला आणि तो यशस्वी झाला. त्यांनी हा विषय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर मांडला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणांची येत्या २६ तारखेला बैठक होणार आहे. त्यावेळी हा विषय पुन्हा प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहे. नागरिक स्वयंस्फूर्तीने आपल्या घरीच गणेशमूर्ती विसर्जित करू शकतात. तसेच महापालिका व प्रशासनातर्फे हा उपक्रम राबविता येऊ शकतो. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात हा यशस्वी प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा पर्यावरणप्रेमी संस्थांचा मानस आहे. वजनानुसार वापर प्लास्टर आॅफ पॅरिसची गणेशमूर्ती कित्येक दिवस पाण्यात विरघळत नाही; त्यामुळे जलप्रदूषण होते तसेच मूर्तीचाही अवमान होतो. मात्र खाण्याचा सोडा वापरल्याने मूर्ती दोन तासांत विरघळते. त्यामुळे नागरिक घरच्या घरीही मूर्ती विसर्जन करू शकतात. मूर्तीच्या वजनाच्या प्रमाणात म्हणजे मूर्तीचे वजन एक किलो असेल तर एक किलो सोडा असे त्याचे प्रमाण आहे. खाण्याचा सोडा हा स्वयंपाकात नेहमीच्या वापरातील असल्याने भावना दुखावण्याचा किंवा आक्षेप घेण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. शेतीसाठी उपयुक्त कोल्हापुरात ३५०० हेक्टर शेतजमीन मीठ फुटून नापीक झाली आहे. अशा नापीक जमिनीवर हे प्लास्टर आॅफ पॅरिस आणि सोड्याचे मिश्रण उपायकारक आहे. विरघळलेल्या मूर्तींचे हे मिश्रण अशा शेतजमिनींवर टाकल्यास ती पुन्हा पिकवण्यायोग्य होऊ शकते. गणेशमूर्तीसाठी शाडू मिळणार नाही; त्यामुळे आपण प्लास्टर आॅफ पॅरिसचा वापर थांबवू शकत नाही. मात्र प्रदूषण रोखण्यासाठी अगदी घरच्या घरीसुद्धा सोड्याच्या साहाय्याने गणेशमूर्ती विसर्जित करता येते. हा नवीन प्रयोग यंदाच्या गणेशोत्सवात प्रायोगिक तत्त्वावर करता येईल. - उदय गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ
‘पीओपी’ची मूर्ती विरघळते दोन तासांत
By admin | Published: August 24, 2016 12:52 AM