कोल्हापूर : राज्यात आमचे सरकार असतानाही शासकीय समित्यांवर नियुक्त्या होत नसल्याने कार्यकर्त्यांत नाराजी आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ही प्रक्रिया पार पाडली नाहीतर पालकमंत्री हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांच्या दारात जाऊन बसूया, असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी दिला. महायुतीतील तिन्ही पक्षांत समन्वय नाही, विधानसभेला एकदिलाने सामोरे गेलो तरच महाराष्ट्र जिंकू, असेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बुधवारी होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.मेळावा यशस्वी करण्यासाठी काही सूचना असतील तर मांडा, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितल्यानंतर खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक बोलले. मंडलिक आपले बोलणे संपवत असताना, ‘महेशरावां’च्या मनात अनेक प्रश्न आहेत, त्याची उघड चर्चा करू नका, मंत्री मुश्रीफ यांच्या कानात सांगा’, असा टोला लगावला.त्यानंतर बोलण्यास सुरुवात केल्यानंतर महेश जाधव म्हणाले, सकाळीच रंकाळ्यावर एका वृत्तवाहिनीने चर्चेसाठी सर्वपक्षियांना बोलावले होते. महायुतीकडून आपण एकटाच होतो. शिंदेसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची खुर्ची मोकळी होती. मग, आपली कामे लोकांपर्यंत पोहोचणार कशी? विधानसभा निवडणुकीला आपण एकदिलाने सामोरे गेलो तर महाराष्ट्र जिंकू. शासकीय समित्यांवरील नियुक्त्याबाबत आता बोलणार नाही. विधानसभेनंतर नियुक्त्या केल्या नाही तर मंत्री मुश्रीफ व खासदार महाडिक यांच्या दारात जाऊन बसूया, असे सांगत असताना मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यात असल्याने त्यांना सोडल्याचेही जाधव यांनी सांगितले.फडणवीस यांचे आश्वासन अन्..देवेंद्र फडणवीस २०१४ ला सत्तेवर आल्यानंतर शासकीय समित्यांबाबत कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण, त्यांनी पाच वर्षांत न करता २०१९ नंतर करण्याचे आश्वासन दिले. ही पाच वर्षेही गेली, आता २०२४ चे आश्वासन दिल्याचे महेश जाधव यांनी सांगितले.
Kolhapur:..नाहीतर मुश्रीफ, महाडिक यांच्या दारात बसू; भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 12:22 PM