हुपरी : रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये होऊ घातलेली निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यामध्ये खरोखरच हिंमत असेल तर त्यांनी या रणांगणातून पळ न काढता निवडणुकीस सामोरे जावे. या निवडणुकीत त्यांचा पराजय अटळ आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.भारतीय जनता पक्ष -जनसुराज्य पक्ष व मित्रपक्षांच्या वतीने रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी हुपरी-रेंदाळ परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच रेंदाळ जिल्हा परिषदेसाठी उद्योजक महावीर शंकर गाठ व चंदूर पंचायत समितीसाठी शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे संचालक रघुनाथ पाटील यांची उमेदवारी पालकमंत्री चंद्रकांतदादांनी यावेळी जाहीर केली.यावेळी मंत्री पाटील म्हणाले, देशातील जनतेने मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून केंद्रात व राज्यात भाजपच्या हातात सत्ता दिली. या सरकारने देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी, विद्यार्थी, महिला, उद्योजक यांच्यासाठी अनेक चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन सर्वच घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले आहे. जनतेच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक चांगल्या व अत्यंत प्रभावी योजना प्रत्यक्षात अमलात आणण्याचे नियोजन केले आहे. गावोगावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जनतेने आता जिल्हा परिषदेची सत्ताही भाजप व मित्रपक्षांच्या हातात देण्याची गरज आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी फार मोठी मदत मिळणार आहे.यावेळी शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, अशोक स्वामी, माजी आमदार राजीव आवळे, उमेदवार महावीर गाठ, रजनीताई मगदूम, अण्णासाहेब शेंडुरे, विक्रम पाटील, अनिल पाटील, सचिन मेथे, आदी उपस्थित होते.सर्वसामान्यांचा हक्क हिरावून घेतलाआमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, सर्वप्रकारच्या सत्ता केवळ आपल्याच घरात असाव्यात, अशा प्रकारचा रोग जडलेल्या प्रकाश आवाडे यांना रेंदाळ मतदारसंघातील जनता या निवडणुकीत निश्चितपणे घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक निवडणुकीत सपाटून मार खावा लागलेल्या आवाडे परिवाराला आपल्या अस्तित्वासाठी आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हक्क असणारी जिल्हा परिषदेची उमेदवारी हिरावून घेऊन त्यांच्यावर आपल्याच मुलाची उमेदवारी लादावी लागत आहे. मात्र, या मतदारसंघातील स्वाभिमानी जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
आवाडे यांनी हिंमत असेल तर निवडणुकीस सामोरे जावे
By admin | Published: January 29, 2017 12:46 AM