कोल्हापूर : आपले ५ ते १० वर्षांपर्यंतचे मूल जर वारंवार डायपर ओले करत असेल, सारखी शू करत असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने डॉक्टरांना दाखवा. कारण, हा टाईप १ प्रकारचा मधुमेह असण्याची शक्यता आहे. हा दुर्मिळ आजार असून जिल्ह्यातील ५० हजार लोकसंख्येमागे एखादे बाळ या आजाराने ग्रस्त आहे.
नवजात बाळ किंवा शून्य ते ५ वर्षांपर्यंतचे मूल वारंवार शू करणे ही बाब अगदीच सर्वसामान्य आहे. पावसाळा, हिवाळा असेल तर शू करण्याचे प्रमाणदेखील जास्त असते. त्यामुळे या बाबीकडे महिलाच काय सगळे कुटुंबीयच दुर्लक्ष करत असतात; पण वय वाढेल त्याप्रमाणे शू करण्याचे प्रमाण कमी येत नसेल किंवा विशेषत: ५ ते १० वर्षांपर्यंतचे मूल वारंवार शू करत असेल, त्यांना सारखे डायपर घालावे लागत असेल, तर ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. कारण हा आजार टाईप १ मधुमेह असू शकतो.
हा आजार दुर्मिळ असून जिल्ह्यातील ५० हजार लोकसंख्येमागे एखाद्या बालकाला तो होतो. वाढते वय असते. त्यामुळे मधुमेहाचे प्रमाण स्थिर न राहता सारखे बदलत असते. त्यामुळे सारखे त्यावर लक्ष ठेवावे लागते. मुलांना आयुष्यभर मात्र इन्श्युलीनचा आधार घ्यावा लागताे.
--
इन्श्युलीनचाच आधार
मोठ्या माणसांमधील मधुमेह औषधे, गोळ्यांनी नियंत्रणात आणता येते, पण बालकांमध्ये हा समतोल साधणे शक्य होत नाही. त्यांच्यावरील उपचारही तसे गुंतागुंतीचे होऊन बसतात. मधुमेहाचे प्रमाण किती आहे, यावर इन्श्युलीनची मात्रा ठरवली जाते. आठवड्यात रोज किंवा एक-दोन वेळा हे इंजेक्शन द्यावे लागते. त्यात थोडे जरी मागे पुढे झाले तर अचानक शरीरातील साखर वाढून बाळ बेशुद्ध होण्याची शक्यता असते. त्यामुळे दर आठवड्याला रक्त तपासणी करून इन्श्नुलीनचे डोस द्यावे लागतात.
---
आहार, व्यायामात हवा समतोल
मुलांचे वाढते वय असते, गोड तसेच मधुमेहासाठी वर्ज्य असलेले पदार्थ खायची इच्छा असते. त्याला नकार देणं पालकांनाही जड जाते. पदार्थातील साखरेचे प्रमाण टाळताना मुलांना पुरेसे पोषण मिळावे, असा आहार त्यांना द्यावा लागतो. तसेच व्यायामाकडे विशेष लक्ष द्यावे लागते.
---
काय आहेत लक्षणे
-ही मुलं वारंवार शू करतात.
-भूक लागते, जेवणाचे प्रमाण जास्त
-वयानुसार आणि खालेल्या अन्नानुसार वजन वाढत नाही.
----
आई-वडिलांना डायबिटीज असेल तर
आई किंवा वडील दोघांपैकी एकाला जरी मधुमेह असेल तर ते अनुवांशिकरित्या लहान मुलांमध्ये येऊ शकते; पण हे प्रमाण बालकांमध्ये तसे कमी आहे. टाईप १ मधुमेह अनुवांशिकपणे येण्यापेक्षा बालकाच्या जडणघडणीतील दोषांमुळे निर्माण होतो.
---
बालकांमधील टाईप १ मधुमेह हा दुर्मिळ आजार आहे. बालकाने वारंवार शू करणे किंवा वजन न वाढणे याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा आजार वय वर्षे ५ ते १० या कालावधीत डिटेक्ट होतो. त्याकडे दुर्लक्ष न करता बालकांची आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
-डॉ. मोहन पाटील, बालरोगतज्ज्ञ
---