कोल्हापूर : महापालिकेत सत्तेत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांनी शासनाकडून विकासासाठी आलेला पैसा हा स्वत:साठीच वापरल्याने शहराचा विकास खुंटला, अशी घणाघाती टीका, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी बुधवारी येथे केली. भाजपचा महापौर केल्यास केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद हॉल येथे आयोजित ‘झेप’ या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. भाजप, ताराराणी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं (ए) महायुतीतर्फे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. खासदार दानवे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार संजयकाका पाटील, भाजपचे प्रदेश संघटनमंत्री सुनील कर्जतकर, प्रवक्त्या कांता नलवडे, आमदार अमल महाडिक, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरुप महाडिक, प्रवक्ते सुनील मोदी, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, ‘रिपाइं’(ए)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, विश्वविजय खानविलकर, रामभाऊ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. दानवे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकेचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता त्याप्रमाणे झालेला नाही. शासनाकडून विकासासाठी आलेला पैसा हा ज्या-त्या विकासकामांवर खर्च न होता नेत्यांनी स्वत:साठी वापरल्याने वैभवशाली व सांस्कृतिक शहराचा विकास खुंटला आहे. काँग्रेसने देशाचे वाटोळे केले आहे. त्याला महापालिकाही अपवाद नाही. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारप्रमाणे या ठिकाणीही भाजपची सत्ता आल्यावर सर्व योजना आणून येथील विकास केल्याशिवाय राहणार नाही. पालकमंत्री पाटील म्हणाले, महापालिकेत भाजप-महायुतीची उमेदवारी देताना त्याचे कर्तृत्व, चारित्र्य, सामाजिक जाणीव व क्षमता या गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. सर्वांनाच उमेदवारी देणे शक्य नसल्याने कोल्हापूर शहराचा विकासासाठी पक्ष ज्याला उमेदवारी देईल. त्याच्या पाठीमागे इतरांनी राहून विकासाला हातभार लावावा. महेश जाधव म्हणाले, रंकाळा, पंचगंगा प्रदूषण असे अनेक प्रश्न शहरवासीयांना भेडसावत आहेत. ‘आयआरबी’सारखे प्रकल्प माथी मारण्याचे काम करत थेटपाईपलाईन व नगरोत्थानमध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादीने मोठा भ्रष्टाचार केला आहे. भगवान काटे म्हणाले, राष्ट्रवादी व काँग्रेसने प्रदूषित केलेली महापालिका पवित्र करण्याचे काम भाजप महायुती करेल. आतापर्यंत त्यांच्याकडून ‘पैसा अडवा आणि जिरवा’ इतकेच काम झाले आहे. उत्तम कांबळे म्हणाले, उमेदवारी देताना काँग्रेस व राष्ट्रवादीकडून तुमच्याकडे पैसे किती आहेत हे विचारले जाते परंतु भाजप महायुतीकडे मुलाखत देताना त्याचे कर्तृत्व, सामाजिक बांधीलकी, विकासाचा आराखडा हे पाहिले जाते. सुनील मोदी यांनी कमळाच्या चिन्हावर निवडून आलेला महापौर घेऊनच प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला येऊ, अशी ग्वाही दिली. जिल्हा सरचिटणीस राहुल चिकोडे यांनी सूत्रसंचालन केले. पवारांना आताच भाजप का जातीयवादी वाटतो? १९८५ च्या निवडणुकीत भाजपबरोबर युती करणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांना आताच भाजप का जातीयवादी वाटतो? असा सवाल दानवे यांनी केला. चंद्रकांतदादांच्या शब्दाला मंत्रिमंडळात किंमत आहे. त्यांचा शब्द राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपणही टाळू शकत नाही. त्यांनी शहरासाठी २० कोटी रुपये निधी आणला आहे. अशा माणसाच्या पाठीमागे जनतेने राहिल्यास शहराचा कायापालट होईल, असे दानवे म्हणाले. उपस्थित मान्यवर बाजार समितीचे संचालक सदानंद कोरगांवकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, ताराराणी आघाडीचे संयोजक सुहास लटोरे, माजी महापौर सुनील कदम, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई, नगरसेवक आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, नगरसेविका प्रभा टिपुगडे, माणिक पाटील-चुयेकर, सुरेशदादा पाटील, आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
भाजपचा महापौर झाल्यास निधीचा महापूर
By admin | Published: September 10, 2015 12:39 AM