लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ब्रह्मपुरीतील ख्रिस्ती समाजाच्या पॅरिस हॉलमध्ये बेकायदेशीर काम सुरू आहे. राजकीय दबाव, पैशाच्या जोरावर आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे इमारत बांधकाम सुरू ठेवल्यास समाजाच्या वतीने आमरण उपोषण करू, असा इशारा हॉली इन्व्हॅनजलिस्ट चर्चच्या वतीने पास्टर एस.एम. गोगटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.
गोगटे म्हणाले, बीडीटीए संस्थेचे व्यवस्थापक जीवन आवळे आणि आशुतोष डेव्हिड यांनी, कोल्हापुरातील ब्रह्मपुरी येथील पॅरिस हॉलच्या दुरुस्तीचा घाट घातला आहे. स्थानिक ख्रिस्ती समाजाच्या वतीने मी त्याला विरोध केला. पॅरिस हॉलची सुरू असलेली डागडुजी थांबवण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यास शिवसेनेने पाठिंबा दिला होता. यावेळी मालमत्ता व्यवस्थापक आवळे यांनी, एकही खात्रीलायक कागद दाखवलेला नाही. ही मिळकत बीडीटीए संस्थेची आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने बेकायदेशीर दावा करणाऱ्यांविरोधात निकाल दिला आहे. जागेसंदर्भात न्यायालयाने कोणता निकाल दिला आहे. तो त्यांनी जाहीर करावा, असे आवाहन गोगटे यांनी पत्रकार परिषदेत केले. पॅरिस हॉल हा ब्रह्मपुरी ख्रिस्ती समाजाचा आणि मालकी वहिवाटीचा आहे. त्यामुळे तो दुरुस्तीचा प्रयत्न करू नये. केल्यास समाजातर्फे आमरण उपोषण करू, असा इशाराही गोगटे यांनी दिला. यावेळी संदीप आवळे, संजय भोसले, सतीश कांबळे, अरुण खोडवे उपस्थित होते.