कोल्हापूर : खासगी प्राथमिक शाळांना तसेच मनपा शाळांना जोडून असणाऱ्या पूर्वप्राथमिक (बालवाडी) वर्गांना शासनमान्यता मिळावी, या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मान्य कराव्यात नाही तर राज्यातील सर्व बालवाडी शिक्षिका व सेवकांच्यावतीने विधानसभेला नकारात्मक मतदान करण्यात येईल, असा इशारा राज्याध्यक्ष सुचेता कलाजे व राज्य निमंत्रक संतोष आयरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. सुचेता कलाजे म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ संलग्न बालवाडी शिक्षिका व सेविका महासंघ आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून महासंघ प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून दि. २८ जुलैला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. दि. ६ आॅगस्टला मुंबईतील आझाद मैदान येथून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्य निमंत्रक आयरे म्हणाले, राज्यात १८ हजार बालवाडी शिक्षिका आहेत तर १० हजार सेविका आहेत. बालवाडी शिक्षका व सेविका विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या ३०० ते ५०० रुपये इतक्या तुटपुंज्या फीमधून तर काही ठिकाणी संस्थाचालकांकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनावर हलाखीचे जीवन जगत आहेत. खासगी-प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे म्हणाले, शासनाचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बीड येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये महासंघाचे मुख्य सचिव के. आर. तुंगार यांनी राज्यव्यापी लढ्याची निश्चित भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार राज्यव्यापी धरणे आंदोलन व मुंबई येथील आझाद मैदान येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी प्राची कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अंजनी नवाळे, मंगला उगारे, सुजाता शिंदे, नीशा बडवे, बिना राशिंगकर, संगीता पाटील, सविता वठारे, सुरेखा कोळेकर, धर्माजी सायनेकर, राजाराम संकपाळ, रंगराव कुंभार, एम. डी. पाटील, सुधीर पोवार, शीतल नलवडे आदी उपस्थित होते.
मागण्या मान्य न झाल्यास विधानसभेला ‘नोटा’
By admin | Published: July 23, 2014 12:30 AM