रासायनिक खतांची दरवाढ मागे न घेतल्यास मंत्र्यांना गाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:21 AM2019-03-16T11:21:51+5:302019-03-16T11:23:36+5:30
गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यांचा भुर्दंड शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत बसतोय. त्यामुळे सरकारने तत्काळ ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा मंत्र्यांना गावबंदी केली जाईल, असा इशारा अखिल भारतीय किसान कॉँगे्रसतर्फे शुक्रवारी देण्यात आला.
कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यांचा भुर्दंड शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत बसतोय. त्यामुळे सरकारने तत्काळ ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा मंत्र्यांना गावबंदी केली जाईल, असा इशारा अखिल भारतीय किसान कॉँगे्रसतर्फे शुक्रवारी देण्यात आला. याबाबतचे निवेदन पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, ‘किसान सन्मान योजना’ ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच आहे. शेताच्या बांधावर वस्तुस्थिती पाहता प्रतिमहिना ५०० रुपयांनी काय दिलासा मिळणार आहे? त्यातच रासायनिक खतांच्या दरात ५० रुपये किलोंच्या बॅगमागे १०० ते २०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
मागील काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे. ‘जीएसटी’च्या घोळात ऐन खरिपात किमती वाढविल्या. फेब्रुवारी २०१८ मध्ये संयुक्त खतांच्या किमतीत १३४ रुपयांपर्यंत वाढ झाली.
आॅक्टोबर २०१८ मध्ये इंधन दरवाढीमुळे १०५ ते २५० रुपये प्रतिबॅग अशी घसघशीत वाढ झाली. आताही संयुक्त खतांच्या किमतीत १०० ते २१७ रुपयांची दरवाढ करून शेतकऱ्यांना शॉक दिला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीचा पर्याय निवडला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक बाजू कमकुवत असताना दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.
शिष्टमंडळात संपत पाटील, गजानन पाटील, तानाजी मोरे, योगेश हातलगे, सुशांत मगदूम, निवास भारमल, राजेश घाटगे, सत्यजित पाटील, निवास शेट्टे, आदींचा समावेश होता.