कोल्हापूर : नेत्यांनी संधी दिली तर ‘उत्तर’मधून निवडणूक लढवण्याची तयार असल्याची माहिती कृष्णराज महाडिक यांनी शुक्रवारी दिली. कोल्हापूर शहरासाठी २५ कोटी रुपयांचा निधी आणल्याची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. आम्ही ‘महायुती’ म्हणून सर्वजण एकत्रच आहोत, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले.महाडिक म्हणाले, माझे वडील खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली मी कोल्हापूर शहरासाठी निधी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश आले. यासाठी माजी आमदार अमल महाडिक, सत्यजित कदम यांनीही मदत केली. उत्तर मतदारसंघातील २७ आणि दक्षिण मतदारसंघातील २३ प्रभागांमध्ये हा निधी देण्यात आला असून, यातून उत्तम रस्ते करण्यात येणार आहेत.
भीमा स्विमिंग टॅंकसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच येथून पुन्हा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू तयार होण्याचे काम सुरू होईल. भीमा क्रीडा अकादमीच्या वतीनेही आता विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी बाबा पार्टे, संजय निकम, नंदकुमार मोरे, नीलेश देसाई, उदय शेटके, किरण शिराळे, विलास वास्कर, किरण नकाते, रूपाराणी निकम, स्मिता माने, उमा इंगळे उपस्थित होत्या.
राजकीय वारसदारगेल्या चार-पाच महिन्यांपासून कृष्णराज विधानसभेची तयारी करत आहेत. तसे फलकही शहरभर झळकले आहेत. भाजपमधूनच महाडिक यांचे नातेवाईक सत्यजित कदम हे इच्छुक असताना, दुसरीकडे कृष्णराज यांच्या फलकांमुळे चर्चाही सुरू झाली. ‘संधी मिळाल्यास लढणार’ असे सांगत असल्याने, कृष्णराज हेच धनंजय महाडिक यांचे राजकीय वारसदार असतील, असे दिसत आहे.