रूकडी माणगाव : शासन छुपा जी आर काढून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. बुडव्या कर्जदारांना कोट्यवधी मदत मग शेतकऱ्याला देताना हात का आखडतो. शासन शेतकऱ्यांची फसवणूक करत असून, जर मदत द्यायची नसेल तर आता पुराने आम्ही निम्मे मेलो आहोतच आणि सरकारची इच्छाच असेल तर जलसमाधी घेऊन जीव देऊ, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यानी माणगावात दिला. आक्रोश शेतकऱ्यांचा परिक्रमा पंचगंगेचा या पदयात्रा संपर्क प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसभापती अरूण मगदूम होते.
माजी खासदार शेट्टी म्हणाले की, ज्यांना कळत नव्हते त्यांनी प्रति गुंठा साडेनऊशे भरपाई दिली तर ज्यांना कळतेय म्हणून बसविले त्यांनी प्रतिगुंठा एकशे तीस रुपये मदत जाहीर केली आहे. एकशे तीस रुपये मध्ये कुजलेला ऊस व पालासुद्धा शेतातून बाहेर निघत नाही, अशी तुटपुंजी मदत जाहीर करून सरकार शेतकऱ्याची चेष्टा चालवित आहे. जाहीर केलेल्या मदतीमध्ये सरकारने बदल न केल्यास १ सप्टेंबरपासून प्रयाग चिखलीहून निघणारा आक्रोश मोर्चा पाच सप्टेंबर रोजी नृसिंहवाडी येथे पोहोचणार आहे.
प्रभारी सरपंच अख्तर भालदार यांनी माणगावच्यावतीने पदयात्रेस मदत करण्याचे आश्वासन दिले. माजी सरपंच लक्ष्मण कोळी यांनी माजी खासदार राजू शेट्टी जे आदेश देतील त्याप्रमाणे पदयात्रेस सर्वेतोपरी मदत करू, असे जाहीर केले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मनोज आदाण्णा, नितीन काबळे, प्रकाश पाटील, अभिजित घोरपडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील, सचिन बोरगावे, आय.वाय.मुल्ला, सुभाष मगदूम, दिलीप महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक अभय व्हनवाडे यांनी तर आभार माजी सरपंच जिनगोंडा पाटील यांनी मांडले. सभेस प्रचंड संख्येने शेतकरी उपस्थित होते.