साके : शिवसैनिक असावा तर अमरिशसिंह घाटगेंसारखाच असावा, असे गौरवोद्गार युवा सेनाप्रमुख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले. ते म्हणाले, राज्यामध्ये गावागावात आणि खेड्यापाड्यात माझे शिवसैनिक काम करत आहेत. सत्तेबरोबरच समाजकार्य महत्त्वाचे आहे. मुंबई येथे गोकुळ दूध संघात अमरिशसिंह घाटगे यांची दुसऱ्यांदा संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल घाटगे यांनी आदित्य ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली, यावेळी ठाकरे बोलत होते.
ठाकरे म्हणाले, माजी आमदार संजय घाटगे हे शिवसेनेमुळेच आमदार झाले होते. त्यावेळी त्यांनी केलेली विकासकामे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, गोकुळ दूध संघ यामार्फत ग्रामीण भागातील शेतकरी, कार्यकर्ते यांच्यापर्यंत पोहोचली. यामुळेच विरोधी पॅनलमधून उभे राहूनसुद्धा ते दुसऱ्यांदा संचालक म्हणून निवडून आले ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यामुळे निश्चितच शिवसेनेची ताकद वाढलेली आहे. पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी ठाकरे यांनी घाटगे यांना शुभेच्छा दिल्या. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी विजय खेचून आणला आणि शिवसेनेची ताकद वाढवल्याबद्दल अमरिशसिंह घाटगे यांचे त्यांनी कौतुक केले. विकासकामांसाठी शिवसेना कुठेही कमी पडणार नाही, याची खात्री त्यांनी यावेळी दिली. यावेळी युवा सेना सचिव वरूण सरदेसाई, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कागल तालुका निराधार समितीचे माजी अध्यक्ष धनराज घाटगे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळी : मुंबई येथे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची अमरिश घाटगे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी कागल तालुका निराधार समितीचे माजी अध्यक्ष धनराज घाटगे उपस्थित होते.