कोल्हापूर : तुकोबाची गाथा इंद्रायणीत वाहिली... उठ गड्या, असंच राहिलो डोळं मिटून, तर तांबडंच फुटणार नाही... विषाची जिथे लावली रोपटी, त्या गावातले दूध प्यावे कसे.. असे एकाहून एक सरस पोवाडे सादर करीत बिंदू चौक येथे सोमवारी शहीद भगतसिंग आणि गोविंद पानसरे यांच्या वैचारिक क्रांतीचा जागर करण्यात आला. निमित्त होते शहीद भगतसिंग यांच्या शहीद दिनानिमित्त आणि ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या बलिदानाच्या स्मृतीनिमित्त ‘शहीद भगतसिंग ते पानसरे : एक संघर्ष’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक आंदोलनाचे.. सायंकाळी सहा वाजता बिंंदू चौक येथे झालेल्या या सांस्कृतिक आंदोलनात शाहीर आणि चित्रकारांनी आपल्या कलेतून भगतसिंग, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांना सलाम केला. दीप्ती सावंत, तृप्ती सावंत, साक्षी सूर्यवंशी यांनी गोविंद पानसरे यांच्यावर आधारित लाल सलाम, माझा कॉम्रेड अण्णांना लाल सलाम हा पोवाडा सादर केला. शाहीर सदाशिव निकम आणि आझाद नायकवडी यांनी गोविंद पानसरे, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या वैचारिक प्रबोधनावर प्रकाश टाकणारे पोवाडे सादर केले. शाहीर निकम यांनी पालखीचे भोई, तर तांबडंच फुटणार नाही, हे पोवाडे सादर केले. आझाद नायकवडी यांनी जातिव्यवस्थेवर भाष्य करणारा पोवाडा सादर केला. जयसिंग चव्हाण, राम मेस्त्री, विठ्ठल माधव, प्रशांत महेकर, राहुल रेपे, प्रशांत घुलवडे, सागर ढेकणे, प्रशांत सुतार यांनी भगतसिंग ते पानसरे एक संघर्ष या संकल्पनेवर आधारित विविध चित्रकृती साकारल्या. तसेच हिंदुत्ववादी संघटनांवर कुंचल्याच्या माध्यमातून मार्मिक टीकाही केली. मिलिंद यादव, एस. बी. पाटील, अजय दळवी, सुभाष वाणी, उमेश पानसरे, अनिल चव्हाण, शिवाजी माळी, रघुनाथ कांबळे, सतीशचंद्र कांबळे, राजाभाऊ शिरगुप्पे, गौतम कांबळे, उदय नारकर, सुनील जाधव, निहाल शिपूरकर, प्रशांत पिसे, सुशीलकुमार शिंदे, जीवन बोडके यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रा. विलास रणसुभे, शंकर पाटील यांच्या हस्ते शाहिरांचा गौरव करण्यात आला. आर. डी. आतकिरे आणि दिलीप पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.(प्रतिनिधी)
असंच राहिलो डोळं मिटून, तर तांबडंच फुटणार नाही
By admin | Published: March 23, 2015 11:51 PM