कोल्हापूर : बारावीच्या परीक्षेची तयारी करायची म्हणून आम्ही अकरावीला उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. त्यातच कोरोनामुळे गेल्यावर्षी वार्षिक परीक्षादेखील झाली नाही. त्यामुळे आता राज्य शिक्षण मंडळाने ठरविलेल्या सूत्रानुसार बारावीचे मूल्यमापन झाल्यास आम्हाला कमी गुण मिळण्याची शक्यता आहे. या मूल्यमापनात समाधानकारक गुण मिळाले नाही, तर पुन्हा बारावीची परीक्षा देण्याची कोल्हापुरातील विद्यार्थ्यांची मानसिकता आहे.
कोरोनामुळे राज्य शासनाने यावर्षी बारावीची परीक्षा रद्द केली. त्याबाबतचा निर्णय जाहीर करून महिना उलटला, तरी या इयत्तेतील मूल्यमापनाचे सूत्र ठरले नव्हते. राज्य शिक्षण मंडळाने सीबीएसई शिक्षण मंडळाच्या धोरणावर अवलंबून असणारे ३० : ३० : ४० (दहावी : अकरावी : बारावी) हे सूत्र शनिवारी जाहीर केले. याबाबतच्या विद्यार्थी, पालकांची भावना ‘लोकमत’ने जाणून घेतल्या. त्यामध्ये दहावीमध्ये अभ्यास करून चांगले गुण मिळविले. पुढे बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने अकरावीमध्ये केवळ उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. त्यातच वार्षिक परीक्षाही झाली नाही. आता बारावीचे मूल्यमापन करताना अकरावीतील ३० टक्के गुणांचा विचार केला जाणार आहे. त्याचा फटका बसण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे.
चौकट
मूल्यमापनाचे सूत्र असे
दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या सत्र परीक्षा, सर्व चाचण्या आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्के गुणांचा मूल्यमापनाच्या सूत्रात समावेश आहे.
विद्यार्थी काय म्हणतात?
या मूल्यमापनाच्या सूत्रात अकरावीच्या गुणांचा विचार होणार असल्याने बारावीतील टक्केवारीवर निश्चितपणे फरक पडणार आहे. आम्हाला कमी गुण मिळण्याची भीती वाटत आहे.
-सुयोग चौगुले, केर्ली
बारावीच्या गुणांवर आमचे पुढील शैक्षणिक भवितव्य अवलंबून आहे. या मूल्यमापनात कमी गुण मिळाल्यास श्रेणीसुधार योजनेअंतर्गत मी पुन्हा परीक्षा देणार आहे.
-मयूरी दळवी, न्यू वाडदे.
पालक काय म्हणतात?
खरं तर अशा पद्धतीने गुण देणे योग्य वाटत नाही. परीक्षा होणे आवश्यक होते. पण, कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. माझ्या मुलीला समाधानकारक गुण मिळाले नाही, तर ती पुन्हा परीक्षा देईल.
-अनिल इंगळे, जवाहरनगर.
कोरोनामुळे परीक्षा रद्द केली, हे ठीक आहे. मात्र, भविष्याचा विचार करता विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये. माझी मुलगी मेरीटमधील आहे. तिला कमी गुण मिळाल्यास आम्ही पुन्हा परीक्षा देण्याचा विचार करणार आहोत.
-सविता टिपुगडे, दत्तनगर-फुलेवाडी
पॉईंटर
कोल्हापूर विभागातील बारावीतील विद्यार्थी
कला : ३४०९३
वाणिज्य : २७६७३
विज्ञान : ५००७६
एमसीव्हीसी : ५८४१
टेक्निकल : ६८