..तर भविष्यात सत्ता स्थापणे अवघड, अजित पवारांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 04:17 PM2022-10-08T16:17:36+5:302022-10-08T16:18:05+5:30
शिंदे-फडणवीस सरकार जाती-धर्मात तेढ निर्माण करणारे सरकार आहे. जातिभेदाचा विचार पुढे घेऊन जाणारे सरकार फार काळ टिकणार नाही.
सरदार चौगुले
कोल्हापूर : आमदार फुटून जर सरकार कोसळायला लागले तर भविष्यात सत्ता स्थापन करणे अवघड आहे. ज्या गद्दारांमुळे आघाडी सरकार पडले, त्या आमदारांसह कोल्हापुरातील गद्दारांनासुद्धा येत्या निवडणुकीत जागा दाखवू. आता मॅच फिक्सिंग न करता एकाच विचारधारेने आणि समजुतीचे राजकारण करूया. त्याची प्रचिती दसऱ्या मेळाव्यात सर्वांना अनुभवायला मिळाली. कोणाचे भाषण सुरू असताना लोक निघून गेले, पैसे देऊन कोणी लोक जमवले आणि पदरमोड करून कोण शिवतीर्थावर आले याकडे राज्यांतील जनतेचे चांगले लक्ष आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.
पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथील ग्रामपंचायत सचिवालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ होते. मेळाव्याचे आयोजन बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी केले.
पवार म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. तो कधी होणार हे माहीत नाही; पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच राज्याचा कारभार हाताळत आहेत. सहा जिल्ह्याचे पालमंत्र्यांची जबाबदारी एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.
महाआघाडीचे सरकार असताना निधी वाटपात, विकासकामात कधीही भेदभाव केला नाही. आघाडी सरकारच्या काळात आम्ही आमदार निधी एक कोटीवरून पाच कोटी केला; मात्र हे सरकार निधी वाटपात भेदभाव करत आहे. बरोबरीने राहू दे, विरोधी आमदारांना निम्म्याने तरी विकास निधी द्या. शिंदे-फडणवीस सरकार जाती-धर्मात तेढ निर्माण करणारे सरकार आहे. जातिभेदाचा विचार पुढे घेऊन जाणारे सरकार फार काळ टिकणार नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढविण्यासाठी प्रयत्न करूया.
यावेळी माजी मंत्री मुश्रीफ यांचेही भाषण झाले. आमदार राजेश पाटील, शिवसेनेचे माजी आमदार सत्यजीत पाटील, संध्यादेवी कुपेकर, राजू आवळे, जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, मानसिंगराव कुपेकर, संतोष धुमाळ उपस्थित होते.
हे असे म्हणाले.. ते असे म्हणाले..
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला पाहिजे होते. ते सोडून हे असे म्हणाले आणि ते असे म्हणाले यातच त्यांनी सव्वा तास घेतला, अशी टोला पवार यांनी लगावला.