कोल्हापूर : हातकणंगले आणि कोल्हापूरलोकसभा मतदारसंघांतील सर्व विधानसभा मतदारसंघांतील राजकीय परिस्थितीची माहिती घेतली. त्यावेळी दोन्ही ठिकाणी काँग्रेससाठी चांगले वातावरण असल्याचे जाणवले. इंडिया आघाडीतून दोन्ही ठिकाणी उमेदवारी मिळाल्यास काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास पक्ष निरीक्षक आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी व्यक्त केले. येथील काँग्रेस कमिटीत आयोजित आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले, महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष भाजपने फोडला. त्यानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय बदल झाले आहेत. त्याची माहिती घेतली. यामध्ये काँग्रेस पक्षासाठी समाधानकारक चित्र असल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस फोडण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. ईडीची धमकी, आमिष दाखवले जात आहे.मात्र, याला कोणाही बळी पडलेले नाही. काँग्रेस एकनिष्ठ आहे. आता मोदींची जादू संपली आहे. या लोकसभेला ते मत मागण्यासाठी गेल्यानंतर मतदार त्यांना महागाई, बेरोजगारीविषयी प्रश्न विचारणार आहेत. म्हणूनच त्यांनी भाजपच्या लोकांना माझ्या नावाचा वापर करून मते मागू नका, असा सल्ला दिला असावा.पत्रकार परिषदेस आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयश्री जाधव, जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील, सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर आदी उपस्थित होते.
२ सप्टेंबरपासून पदयात्राकाँग्रेस पक्षातर्फे २ सप्टेंबरपासून तालुका पातळीवर पदयात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये महागाई, बेरोजगारी अशा ज्वलंत विषयांवर प्रकाशझोत टाकण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यासदेशाची वाटचाल हुकूमशाहीकडे जात आहे. सन २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल. पुढील विधानसभा निवडणुका होतील की नाही, अशी शंका आमदार चव्हाण यांनी उपस्थित केली. अनेक महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका भाजप सरकारने घेतलेल्या नाहीत. त्यांना लोकशाहीतील सर्व संस्था मोडीत काढायच्या आहेत, असाही आरोप त्यांनी केला.