कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज दिले नाहीतर जिल्हा बँक त्यांना कर्ज देईल, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी माहिती बँकेचे संचालक भैया माने यांनी पत्रकातून दिली.
कर्जमाफी आणि कर्ज वाटपाबाबत बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच सगळे स्पष्ट केले आहे. मात्र, ज्यांचे शिक्षण इंग्रजीतून झाले आहे, त्यांना मराठी काय समजणार? शेतकऱ्यांसाठी काही तरी करतो हे दाखविताना स्वत:चे हसे होऊ नये, याची काळजी घ्यावी, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.राज्यातील आघाडी सरकारने कर्जमुक्ती योजना आणून शेतकऱ्यांना अडचणीत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोरोनाचे संकट आणि तांत्रिक अडचणीमुळे ७९०४ शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे ४६ कोटी रुपये आलेले नाहीत. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकेचे ३० कोटी, तर जिल्हा बँकेशी संलग्न शेतकऱ्यांचे १६ कोटी रुपये येणे बाकी आहे.
हे शेतकरी तांत्रिकदृष्ट्या थकीत दिसत असले तरी खरीप हंगाम डोळ्यांसमोर ठेवून त्यांना कर्जपुरवठा करण्याची सूचना राज्यमंत्री मंडळाने केली होती. कर्जमाफीचे पैसे आलेले नाहीत त्या बँकांना सरकारने हमी दिली आहे. तरीही काही बँका आडमुठी धोरण घेत असल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे.
जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज दिले नाहीतर जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या मागे उभी राहील. मात्र, विनाकारण कोणतीही समस्या नसताना प्रसिद्धीसाठी अज्ञान प्रकट करू नये, असेही भैया माने यांनी पत्रकात म्हटले आहे.
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये, दोन लाखांवरील थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेची शासनाने अगोदरच घोषणा केली आहे. दोन्ही कर्जदार शेतकऱ्यांनी आपले कर्ज ३० जूनपर्यंत परतफेड केले पाहिजे, असे आवाहनही माने यांनी केले.