कोपार्डे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालिंगा येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात झालेल्या विचारमंथनात जेथे राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाला तेथील कार्यकर्त्यांवरच अन्याय होत असल्याचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी मान्य केले. तो दूर केला जाईल असे आश्वासन देताना आगामी विधानसभेत युती झाल्यास मोठा अडसर निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, गेली पंधरा वर्षे कार्यकर्ते जसे अधांतरी होते व सोयीने शिवसेना किंवा काँग्रेसला मदत करीत होते, तशीच परिस्थिती युतीनंतर निर्माण होणार आहे हे स्पष्ट आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवून आमदार हसन मुश्रीफ यांच्यासमोर कार्यकर्त्यांना व्यथा मांडण्याचे व्यासपीठ निर्माण करून दिले. या मेळाव्याला कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे आले आणि अजून तालुक्यात राष्ट्रवादी शिल्लक असल्याची प्रचिती आली. येथे ज्या मोजक्या कार्यकर्त्यांना पक्षातील स्थान व युतीमुळे इतर पक्षांनी केलेली कार्यकर्त्यांची गोची याचा पाढाच वाचला. तालुक्यात ज्या राष्ट्रवादी पक्षाचा जन्म स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्या घरी झाला, त्याच तालुक्यातील कार्यकर्ते कुठल्याच सत्तेच्या व्यासपीठावर दिसत नसल्याने खानविलकर यांनी सर्वसामान्यांचा पक्ष अशी निर्माण केलेली ओळख आता पुसली जात आहे.
तरीही कार्यकर्ते स्वाभिमानाने पक्षाशी एकनिष्ठ आहेत. मात्र, ही व्यथा मधुकर जांभळे व तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई यांनी मांडल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील यांची भाषणे झाली आणि पुन्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोरकेच राहणार अशी चर्चा सुरू झाली. यावेळी ज्येष्ठ नेत्यांच्या भाषणात आगामी विधानसभा निवडणुकीत जर युती झाली तरी येथील कार्यकर्त्यांचा सन्मान करू आणि युती नाही झाली तर राष्ट्रवादीचा उमेदवार हेमधुकर जांभळे असतील असे बोलून, ही जागा युती झाल्यास काँग्रेसच्या पारड्यात पडणार याला मूक संमती दिली.कार्यकर्ते पोरकेच राहणारसध्याचे राजकीय वातावरण पाहता विधानसभेला काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाची युती अटळ आहे. यामुळे दहा विधानसभा मतदारसंघांत सहा काँग्रेस व चार राष्ट्रवादीला हा २००९ चा फॉर्म्युला पुढे येणार हे निश्चित असून, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या करवीर विधानसभा उमेदवारीला कोणच आव्हान देऊ शकत नाही हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यवेत्त्याची गरज नाही. यामुळे करवीरमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोरकेच राहणार अशी चर्चा मात्र कार्यकर्त्यांत रंगत आहे.