कोल्हापूर : अंबाबाई मूर्ती संवर्धन प्रक्रियेत देवीच्या मूळ रूपाचे संवर्धन करण्याचे वचन पुरातत्त्व विभाग व श्रीपूजकांनी दिले होते. मात्र, मूर्तीच्या डोक्यावर हेतुपुरस्सररीत्या नागमुद्रा कोरलेली नसल्याने मूळ स्वरूपात बदल झाला असून, ही अत्यंत अक्षम्य बाब आहे. न्यायालयाने जबाबदार व्यक्तींना मूर्तीवर पुन्हा नागमुद्रा बनवून देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी वैकल्पिक वाद निवारण केंद्राकडे करण्यात आल्याची माहिती अंबाबाई भक्त समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली. अंबाबाई मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेच्या त्रिशताब्दी वर्षाला सुरुवात होण्याआधी नागमुद्रा घडविली नाही, तर मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. अंबाबाई मूर्ती संवर्धन प्रक्रियेत नागमुद्रा घडवायचे राहून गेल्याने तिच्या आदिशक्ती या मूळ रूपात बदल झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर अंबाबाई भक्त समितीचे महेश उरसाल, प्रमोद सावंत, बंडा साळोखे, किशोर घाटगे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका विशद केली. ते म्हणाले, अंबाबाई मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेला सप्टेंबरमध्ये ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. हा सोहळा भव्य-दिव्य करण्याचे नियोजन केले जात आहे. मात्र, देवीचे मूळ स्वरूपच राहणार नसेल, तर त्या उत्सवाला काहीच अर्थ असणार नाही. वैकल्पिक वाद निवारण केंद्रातील तडजोडनाम्यानुसार पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांना मूर्तीचे मूळ स्वरूप अबाधित राखणे बंधनकारक असताना ते आम्हाला नाग दिसलाच नाही, असे सांगत आहेत. पायाची बोटे, ढालीच्या हाताची पकड, सिंह या सगळ््या मुद्रांना मूळ स्वरूप देणाऱ्या अधिकाऱ्यांनी ‘नाग दिसला नाही’, असे म्हणणे म्हणजे शरमेची बाब आहे. याशिवाय महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्तीतील प्राणतत्त्व काढून घेण्यात आले; पण मूर्तीचे संवर्धन न करताच अधिकारी निघून गेले. धार्मिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील लोकही गप्प आहेत. ही देवी फक्त त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठीच आहे का? तिचे मूळ स्वरूप अबाधित राखणे ही भक्तांची जबाबदारी नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जिल्हाधिकारी, श्रीपूजकांना गांभीर्यच नाहीकरवीरपीठाच्या शंकराचार्यांनी अंबाबाईच्या डोक्यावर नाग असलाच पाहिजे, असे स्पष्ट केल्याने या विषयाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आले आहे. मात्र, देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आणि श्रीपूजकांना त्याचे अजिबात गांभीर्य नाही, अन्यथा त्यांनी तातडीने ही चूक सुधारण्यासाठी प्रयत्न केले असते. श्रीपूजक तर ‘मूर्तीवर नाग नाहीच’, असे खोटे बोलत आहेत.
नागमुद्रा न घडविल्यास जनआंदोलन
By admin | Published: August 11, 2015 11:44 PM