पूर्व नियोजनानुसार सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दि. ४ मे पासून सुरू होणार होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दहावीच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करण्याचा निर्णय सीबीएसईने बुधवारी जाहीर केला. या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश देताना त्यांचे दहावीमध्ये झालेल्या अंतर्गत परीक्षांतील गुणांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे. त्याद्वारे त्यांना गुण, श्रेणी देण्यात येईल. त्याबाबत समाधानी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊन आणखी चांगले गुण मिळविण्याची संधी मिळणार आहे.
प्रतिक्रिया
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीबाबत बोर्डाने घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र, विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला होता. त्यामुळे शाळा पातळीवर परीक्षा घेण्याचा एक पर्याय होता. ज्या विद्यार्थ्यांना स्वत:चे टॅलेंट सिद्ध करायचे होते. ९५ ते १०० टक्के गुण मिळवायचे होते. त्यांना मात्र, फटका बसला आहे.
-डॉ. सरदार जाधव, प्राचार्य, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल.
दहावीच्या परीक्षा व्हायला हव्या होत्या; पण वाढत्या कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य वाटतो. नव्या शैक्षणिक धोरणात या दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करावा. त्यामुळे कोरोनामुळे प्रमोटेड हा शिक्का बसणार नाही.
-तेजस्विनी मोहिते, पालक, रुईकर कॉलनी.
चौकट
दहावीप्रमाणे बारावीचा निर्णय व्हावा
दहावीप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत निर्णय व्हावा. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावयाची त्यांची परीक्षा घेण्यात यावी, अशी प्रतिक्रिया पेठवडगाव येथील बारावीचा विद्यार्थी स्वराज्य घोसाळकर याने व्यक्त केली.
जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
सीबीएसईच्या दहावीच्या शाळा : २८
विद्यार्थी संख्या : ३८००
बारावीच्या शाळा : १०
विद्यार्थी संख्या : ५५०
चौकट
दहावीच्या अंतर्गत परीक्षा
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आतापर्यंत शाळेत दोन चाचण्या, एक सहामाही आणि दोन पूर्व परीक्षा झाल्या आहेत. त्यातील गुणांच्या आधारे अंतिम मूल्यमापन करून त्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.