कोल्हापूर : एक देश, एक कर या धोरणात जीएसटीप्रमाणे ‘रेरा’चाही समावेश केला तरच बांधकाम क्षेत्राला ऊर्जितावस्था येईल, असा विश्वास क्रिडाई नॅशनलचे उपाध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी शनिवारी कोल्हापुरात व्यक्त केला.
क्रिडाई महाराष्ट्रची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी कोल्हापुरात हॉटेल सयाजीमध्ये झाली. या सभेनंतर झालेल्या पत्रकार बैठकीत कटारिया यांनी बांधकाम व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी आणि सरकारची धोरणे यावर सविस्तर विवेचन केले. यावेळी क्रिडाई महाराष्ट्र अध्यक्ष राजीव परीख, उद्योेगपती संजय घोडावत, कोल्हापूर क्रिडाई अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, पुण्याचे महेश यादव यांची उपस्थिती होती.
कटारिया म्हणाले, देशभरातील बांधकाम क्षेत्रातील एकूण उलाढालींपैकी ५0 टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. बांधकाम व्यवसायासाठी सरकारने रेरा हा नवीन कायदा आणला. व्यावसायिकांनी त्याचे स्वागतच केले आहे; पण या कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार राज्यांना दिल्याने घोळ वाढला आहे. बांधकाम क्षेत्र एकच असले तरी प्रत्येक राज्यात ‘रेरा’ची अंमलबजावणी वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे. वेगवेगळे कायदे, नियम, अटीमुळे काम करणे अवघड होऊन बसले आहे. जीएसटीप्रमाणे देशभरासाठी एकच कायदा ठेवून त्याची अंमलबजावणी केल्यास व्यवहारातही सुसूत्रता येणार आहे. काम करताना अडचणी येणार नाहीत.बांधकाम व्यवसायाचा विकास वेगाने होण्यासाठी जमीन विकसन कायदा आणण्याची आजच्या घडीला नितांत गरज असल्याचे मत कटारिया यांनी व्यक्त केले.
दरम्यान, या पत्रकार बैठकीपूर्वी क्रिडाई महाराष्ट्र वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत मार्गदर्शन करताना राज्याध्यक्ष राजीव परीख यांनी जीएसटीसंदर्भात नव्याने येऊ घातलेले युनिफाईड बायलॉज मुंबई वगळता अन्य शहरांना लागू होणार आहेत. मंत्रालयात वारंवार पाठपुरावा केल्यानेच शक्य झाले आहे. सुनील कोतवाल यांनी आढावा घेतला. कोल्हापूर अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी प्रास्ताविक केले.पर्यटन, बांधकामची सांगड घालापर्यटन आणि बांधकाम व्यावसायिक यांची जोड घालून सुसंवाद वाढविल्यास पर्यटनालाही चांगले दिवस येणार आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाचा खजिनाच महाराष्ट्रात आहे, त्याची व्यवसायाशी सांगड घातल्यास पर्यटन आणि बांधकाम या दोन्ही क्षेत्रांचा चांगल्या प्रकारे विकास होईल, असा आशावादही कटारिया यांनी व्यक्त केला.
क्रिडाई वुमेन्स विंग स्थापनइतर क्षेत्राप्रमाणे बांधकाम व्यवसायातही महिलांचे प्रमाण वाढत असल्याने क्रिडाईच्या विंगमध्ये महिलांना सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी क्रिडाई कोल्हापूर वुमेन्स विंग या नावाने खास महिलांसाठी स्वतंत्र विंग स्थापन केल्याची घोषणा क्रिडाई महाराष्ट्रच्या कन्वेनर अर्चना बडेरा यांनी केली. कोल्हापूर विंगसाठी सपना मिरजकर व अर्चना पवार यांची कन्वेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली. मार्केटिंग आणि अकौंट हे दोन महत्त्वाचे विषय महिला उत्तम प्रकारे हाताळू शकतात, असा विश्वास निवडीनंतर क्रिडाई नॅशनलचे उपाध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी व्यक्त केला.जागेचे दर वाढणारजीएसटीचे रिटर्नस देण्याचे धोरण बंद झाल्याचा फटका बांधकाम व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर बसत आहे. पूर्वी रिटर्नस मिळत असल्याने ग्राहकावर भार टाकला जात नव्हता; पण आता ते देणेच बंद झाल्याने नाइलाजास्तव प्रति चौरस फूट २०० रुपये जीएसटीचा बोजा सोसावा लागत आहे. साहजिकच हा बोजा कमी करण्यासाठी घरांच्या आणि जागांच्या किमतीमध्ये वाढ करावी लागत आहे. रिटर्नस न दिल्यास हे दर वाढतच जाणार आहेत, अशी भीतीही कटारिया यांनी व्यक्त केली.
क्रिडाई महाराष्ट्रची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी कोल्हापुरात हॉटेल सयाजीमध्ये झाली. या सभेमध्ये क्रिडाई कोल्हापूर वुमेन्स विंग या नावाने खास महिलांसाठी स्वतंत्र विंग स्थापन करण्यात आली. यावेळी डावीकडून रवी माने, महेश यादव, रवी वडट्टमवर, प्रफुल्ल तावरे, रसिक चव्हाण, विद्यानंद बेडेकर, क्रिडाई नॅशनलचे उपाध्यक्ष शांतिलाल कटारिया, राजीव परीख, सुनील कोतवाल, महेश साधवाणी, विकास लागू, अनिश शहा, दीपक मोदी यांच्यासह वुमेन्स विंगच्या कन्वेनर अर्चना पवार, सपना मिरजकर, अर्चना बडेरा यांच्यासह उद्योगक्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.